हितेन नाईक/ निखिल मेस्त्री / पालघर/ नंडोरेसूर्या नदीचे पाणी वसई-विरार, मीरा-भाईंदर व अन्य महानगरासाठी वळविण्यास जिल्ह्यातील तीन तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी प्रखर विरोध दर्शविला असून ४ मे रोजी मासवण येथे निषेधाची सभाही आयोजिली आहे.नदी तीरावरील पालघर-डहाणू-विक्र्रमगड तालुक्यातील असंख्य गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. धरणाचे बहुतांश पाणी वसई-विरार व अन्य प्रकल्पक्षेत्राबाहेरील ठिकाणी वळविल्यामुळे प्रकल्पक्षेत्रातील तालुक्यांना पुढे सिंचनासाठीच नव्हे तर पिण्यासाठीही पाणी उपलब्ध होणार नाही. सूर्याचे पाणी इतरत्र वळविल्यामुळे प्रकल्पक्षेत्रातील तालुक्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमिवर ४ मे रोजी सूर्या नदी तीरावरील मासवण येथे निषेध सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत तिन्ही तालुक्यातील शेतकरी व आदिवासी एकत्र जमून पाणी वळविण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणार आहेत. धामणी व कवडास धरणांचा सूर्य प्रकल्प हा पालघर-डहाणू-विक्रमगड या तीन तालुक्यांसाठी प्रामुख्याने उभारण्यात आला असून या प्रकल्पाअंतर्गत १४६८६ हेक्टर सिंचनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. १९७८ ते १९८० दरम्यान उभारण्यात आलेल्या या दोन्ही धरणातील पाणी साठा २९९.०१ दलघमी इतका आहे. या प्रकल्पाचे पाणी बिगरसिंचनासाठी पालघर व डहाणू या तालुक्याकरिता वापरण्यात येते आज या दोन्ही तालुक्यांना पिण्यासाठी ४० दलघमी इतके पाणी देण्यात आलेले आहे. याउलट प्रकल्प क्षेत्राबाहेर वसई-विरार, मीरा-भाईदर व मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाकरिता आजवर १८० दलघमी पाणी आरक्षित करण्यात आलेले आहे. सिंचनासाठीच्या या प्रकल्पाअंतर्गत मोठ्या प्रमाणावर हे पाणी या ठिकाणी वळविल्यामुळे १४६८६ हेक्टर सिंचन उद्दिष्टयापैकी ७०८१ हेक्टर जमीन सिंचनातून वगळली जाणार आहे. याचा मोठा फटका आदिवासी व शेतकरी बांधवाना बसणार आहे. परिणामी दुबार पिके घेणाऱ्या या आदिवासी शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधन जाऊन त्यांना बेरोजगारी व पुढे कुपोषणाच्या गर्तेत ढकलले जाणार आहे.
सूर्याच्या पाण्यासाठी स्थानिक एकवटले
By admin | Published: May 03, 2017 5:13 AM