कल्याण - मध्य रेल्वेच्याकल्याण कसारा मार्गावर आसनगाव-आटगाव स्थानकांदरम्यान लोकलचे डबे रुळावरून घसरून दुर्घटना घडली असून, या अपघातामुळेमध्य रेल्वेची आटगाव ते कसारा या डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मात्र या दुर्घटनेत कुठलीही हानी किंवा कुणीही जखमी झालेले नाही अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.
आज सकाळी ७ वाजून २८ मिनिटाच्या सुमारास मध्य रेल्वेच्या आटगाव स्टेशन जवळ लोकलचा 4 था डबा रुळावरून घसरला. ही लोकल कसारा कडे येत होती. लोकलचा डबा रेल्वे रुळावर घसरल्याने आटगाव ते कसारा वाहतूक ठप्प झाली. या लोकलच्या डब्यात 10 ते 12 प्रवासी होते. या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचा मध्य रेल्वेने दावा केला आहे. या अपघाताची माहिती मिळताच मध्य रेल्वेच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन लोकलचा डबा रेल्वे रुळावरून दूर करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. लोकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. तसेच कसारा-कल्याण अप मार्गावरील वाहतुकीवर या अपघाताचा कुठलाही परिणाम झालेला नाही. तर केवळ आटगाव कसारा या डाऊन मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली आहे, असे रेल्वेकडून सांगण्यात आले.
दरम्यान, करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवासास बंदी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील कामगारांनाच रेल्वेतून प्रवासास मुभा देण्यात आली आहे. अत्यंत कमी प्रमाणात लोकांना प्रवासाची मुभा देण्यात आल्याने लोकलच्या फेऱ्याही मर्यादित प्रमाणात चालवण्यात येत आहेत.परिणामी जर नियमित प्रमाणे लोकल सेवा सुरु असती व नियमित प्रमाणे गर्दी असती तर मोठा अनर्थ झाला असता. लोकल चा डब्बा रुळावरून कशामुळे घसरला याबाबत चा खुलासा अदयाप मध्य रेल्वे कडून करण्यात आलेला नाही.