- नितिन पंडीत
भिवंडी: नवी मुंबई येथील विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावी अशी मागणी ठाणे , नवी मुंबई व रायगड जिल्ह्यासह इतरही अन्य ठिकाणच्या स्थानिक भूमीपुत्रांनी लावून धरली आहे. दिबांच्या नामकरण संघर्ष समितीच्या मागणीकडे राज्यसरकार सकारात्म नसल्याने गुरुवार १० जून रोजी ठाणे जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्र सकाळी ११ ते १२ या एका तासात ठिकठिकाणी मानवी साखळी आंदोलन करणार असल्याचा इशारा संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला होता.
संघर्ष समितीच्या इशाऱ्यानंतर गुरुवारी भिवंडीत सकाळी ११ ते १२ या वेळेत ठिकठिकाणी संघर्ष समिती व स्थानिक भूमीपुत्रांनी नवी मुंबई विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे यासाठी मानवी साखळी आंदोलन केले. भिवंडीत कोनगाव ते रांजनोली नाका तसेच रांजनोली नाका ते मानकोली तसेच मानकोली ते खारेगाव टोल नाका अशी सुमारे १५ ते २० किलोमीटर पर्यंत भव्य मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. तर अंजुरफाटा ते राहनाल काल्हेर , कशेळी या मार्गावर देखील मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर भिवंडी बायपास ते येवई नाका ते सावद नाका या मार्गावर देखील भव्य मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. या मानवी साखळी आंदोलनात कोनगाव, गोवे, पिंपळघर , रांजनोली , पिंपळास , ओवळी, पूर्णा, राहनाल, दापोडा, गुंदवली, हायवे दिवे, शेलार, आमने परिसर, येवई नाका, राहनाल, खारबाव अशा अनेक गावांमधील स्थानिक भूमिपुत्र सहभागी झाले होते.
या आंदोलनादरम्यान ठिकठिकाणी पावसाने देखील हजेरी लावली होती मात्र त्यास न जुमानता स्थानिक भूमीपुत्रांनी शांततेत हे आंदोलन पार पडले . शासकीय नियमांचे पालन करून हे आंदोलन शांततेत पार पडले. यावेळी जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जमिनी आमच्या मग नाव का तुमचा, आता आमचा निर्धार ठाम, विमानतळाला दिबांचेच नाव, नवी मुंबई विमानतळाला स्व लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, खात्री पक्की, दिबांचं नाव नक्की अशा आशयाचे फलक हातात घेत आंदोलन कर्त्यांनी शांततेत हे आंदोलन केले. जोपर्यंत दिबांचे नाव विमानतळाला देत नाहीत तो पर्यंत अशा प्रकारे नियमित आंदोलन करण्यात येतील अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी या आंदोलनातून व्यक्त केली.