डोंबिवली : मध्य,पश्चिम रेल्वेतून प्रवास करणाऱ्या ८० लाखांहून अधिक प्रवाशांपैकी दररोज सरासरी १२ जणांचा अपघाती मृत्यू होतो तर १५ जण जखमी होतात. हे प्रकार टाळण्याकरिता लोकलचे दरवाजे बंद होतील, अशी व्यवस्था करावी तसेच रेल्वेच्या फे-यांची संख्या वाढवावी, अशी शिफारस करणारा अहवाल ठाणे डिस्ट्रीक्ट रेल्वे पॅसेेंजर असोसिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाश शर्मा यांनी रेल्वेमंत्री पीयुष गोयल आणि रेल्वे बोर्ड यांना पाठवला आहे.शर्मा म्हणाले की, एवढ्या मोठ्या प्रमाणावर रेल्वे अपघातामधील मृत्यू जगात कुठेही होत नाहीत. रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने बघावे. सातत्याने सूचना देऊनही रेल्वेच्या वृत्तीत मात्र कोणताही बदल होत नाहीत. अपघाताचे सत्र सुरूच आहे. संघटनेच्या सेफ्टी कमिटीने पाठवलेल्या अहवालानुसार, अपघात होणारे रेल्वे मार्गातील खांब त्वरित हटवावेत. लोकल फेºयांमधील अंतर कमी करून १० मिनिटांवर आणावे. कल्याण बदलापूर, कर्जत तसेच कल्याण आसनगाव, कसारा मार्गावर लोकल फेºया वाढवाव्यात. एक्स्प्रेस मेल रेल्वे गाड्यांच्या धर्तीवर उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या पास व तिकिटांवर विमा कवच मिळावे. रेल्वे रूळ ओलांडणाºयांवर कठोर कारवाई व्हावी आदी सूचना समितीने केल्या आहेत.अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, मृत प्रवाशांच्या वारसांना तातडीने भरपाई मिळावी, रेल्वे क्लेम ट्रिब्युनलची संख्या वाढवून प्रवाशांना दिलासा द्यावा. मुंबईची उपनगरीय सेवा लाइफलाइन म्हणून ओळखली जात होती. मात्र सध्या ती डेथलाइन झाली आहे हे योग्य नाही. मुंबईत सर्वसामान्यांचे अपघात कमी करून प्रवाशांचा सुरक्षा कवच द्यावे, असेही ते म्हणाले.
लोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 12:00 AM