कल्याण : कल्याण डोंबिवली परिसराला तौउते वादळी वाऱ्याचा फटका बसल्याने अनेक ठिकाणी झाडे पडली. याशिवाय ठिकठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. काही ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत झाला असला तरी काही भागात मंगळवारी सायंकाळपर्यंत अंधारच होता. याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाल्याने लोकांची गैरसोय झाली.
वादळी वाऱ्यामुळे गायकरपाड्यातील वीज सोमवारी सकाळी १० वाजता खंडित झाली होती. येथील नागरिकांना मंगळवारी दुपारी पाच वाजेपर्यंत खंडित वीज पुरवठ्याचा सामना करावा लागल्याचे या भागातील सुशीला गीते यांनी सांगितले. त्याचबरोबर आंबेडकर रोड आणि वलीपीर रोडवरील वीजपुरवठा सोमवारी चार तासांकरिता खंडित झाला होता. मंगळवारी पुन्हा चार तास वीजपुरवठा खंडित होता. आंबेडकर रोडवरील वीज वाहिनीवरून महापालिकेच्या मुख्यालयातील पालिका भवनास वीजपुरवठा केला जातो. महापालिका भवनाच्या इमारतीत सकाळी चार वाजता वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर अद्याप वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यामुळे महापालिका भवनातील वीजपुरवठा जनरेटरवर सुरू होता.
यासंदर्भात वीज वितरण कंपनीचे अधिकारी म्हणाले की, आमचे कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्नशील आहेत. आमचा एकही कामगार वीजपुरवठा सुरळीत झाल्याशिवाय घरी जाणार नाही.
सोमवारपासून वीजपुरवठा खंडित असल्याने पाणी पुरवठा वितरणावर त्याचा परिमाण झाला. सोमवारी पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र, मंगळवारी पाणीपुरवठा सुरळीत केल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांनी दिली आहे. बुधवारी पाणी कपातीच्या शेड्यूलनुसार शटडाऊन घेण्यात येणार आहे.
----------------------