अंबरनाथ : अंबरनाथहून सकाळी १० वाजून १३ मिनिटांनी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी लोकल कोणतीही पूर्वसूचना न देता बंद केली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कामगारांना याचा मोठा फटका बसला आहे. यासंदर्भात मनसेचे अंबरनाथ शहराचे पदाधिकारी रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यासाठी रेल्वे स्थानकात जाणार होते. मात्र, त्याआधीच पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना अडवून रेल्वे स्थानक परिसरात निवेदन घेऊन कार्यालयास माहिती कळवत असल्याचे सांगितले.
अंबरनाथहून मोठ्या प्रमाणात कामगारवर्ग हा मुंबईला कामासाठी जातो. कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहचण्यासाठी यांना ही लोकल सोयीची आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता ही सेवा बंद केल्याने मनसेने निवेदन देण्याची परवानगी पोलीस प्रशासनाकडून घेतली होती. मात्र, महाराष्ट्र सैनिक रेल्वे स्थानक परिसरात येण्याआधीच पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करून मनसेचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. आम्ही आंदोलनासाठी आलो नसून निवेदन देण्यासाठी आलो होतो. मात्र, एवढा पोलीस फौजफाटा तैनात करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात असल्याचा आरोप मनसेने केला. यावेळी मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर, जिल्हा संघटक संदीप लकडे, अविनाश सुरसे, धनंजय गुरव, अंकित कांबळे यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.