मीरा रोड : मीरा-भाईंदरमध्ये गणेशोत्सव काळात बाहेरून मूर्ती आणून कुठेही मंडप उभारून विक्री करणाऱ्यांमुळे स्थानिक मूर्तिकारांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे अशाप्रकारे मूर्ती विक्री करण्यास मीरा-भाईंदर मूर्तिकार प्रतिष्ठानने विरोध दर्शवला आहे.
मीरा-भाईंदरमध्ये पूर्वीपासून स्थानिक मूर्तिकार हे उत्सव काळात गणपती आणि देवीच्या मूर्ती बनवत आले आहेत. अनेकांचा हा पारंपरिक व्यवसाय आहे. या स्थानिक मूर्तिकारांनी संघटित होऊन मूर्तिकार प्रतिष्ठान ही संघटना सुरू केली आहे. या संघटनेतर्फे मीरा-भाईंदर महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन त्यांच्या मागण्या व सूचना मांडण्यात आल्या आहेत. मूर्तिकार प्रतिष्ठानचे मार्गदर्शक पालिका विरोधी पक्षनेता प्रवीण मोरेश्वर पाटील, शिवकुमार पाटील, सुरेश ज्ञानवलेकर, हेमप्रकाश पाटील, अध्यक्ष सचिन पाटील, सचिव निखिल तावडे, कोषाध्यक्ष हितेंद्र पाटील, उपाध्यक्ष उदय पाटील, कार्याध्यक्ष परमानंद ठाकूर, भालचंद्र म्हात्रे, उद्धव भोईर, योगेश लाड आदींच्या शिष्टमंडळाने आयुक्तांशी चर्चा केली.
सप्टेंबरमध्ये गणेशोत्सव येत आहे. मीरा-भाईंदरमध्ये स्थानिक मूर्तिकार आपली कला आणि व्यवसाय जोपासत गणेशोत्सव, नवरात्रीसाठी मूर्ती साकारत असतात. अनेक जण बाहेरून मूर्ती आणून त्या मंडप उभारून विकतात. काही जण जुन्या, खंडित मूर्ती रंगवून विकतात. तसेच विक्री न झालेल्या मूर्ती मंडपात तशाच सोडून निघून जातात. जेणेकरून मूर्तींची विटंबना आणि धार्मिक भावनांचा प्रश्न निर्माण होतो, असे शिष्टमंडळाने आयुक्तांच्या निदर्शनास आणले.
या आहेत मागण्या
शहरात बाहेरून येणाऱ्या गणेशमूर्ती विक्रेत्यांना मूर्तिकार प्रतिनिष्ठानच्या पत्राशिवाय परवानगी देऊ नये. बेकायदा मंडप उभारणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई केली जावी. शहरात गणेशोत्सव व मूर्ती बनवणाऱ्यांसाठी नियमावली बनवण्यात यावी. लॉकडाऊन काळात मूर्तिकारांना ओळखपत्रे द्यावीत. सार्वजनिक उत्सवाबाबत पोलीस-पालिका आदींच्या बैठकीसाठी मूर्तिकार प्रतिष्ठानला सहभागी करून घ्यावे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आयुक्तांनी त्यावर आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिल्याचे निखिल तावडे यांनी सांगितले.