ठाणे : मध्य रेल्वेवर धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी करणाऱ्यांनी मध्यंतरी चांगलाच धुमाकूळ घातला होता. यात बºयाच जणांना आपले प्राण गमावण्याची वेळ ओढवली होती. ठाणे रेल्वेस्थानकात मागील तीन वर्षांत जवळपास २७० घटनांमध्ये ठाणे रेल्वे सुरक्षा बलाने भारतीय रेल्वे अॅक्टप्रमाणे अशा प्रकारे स्टंट करणाऱ्यांना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, २०१८ पेक्षा २०१९ या वर्षात स्टंटबाजीच्या घटनांमध्ये तब्बल ८० ने घट झाली आहे. यामुळे ठाण्यात तरी स्टंटबाजीला चाप बसल्याचे दिसत आहे. केलेली जनजागृती आणि दाखल केलेल्या गुन्ह्यांमुळे या घटना कमी झाल्याचा दावा ठाणे आरपीएफने केला आहे.
मध्य रेल्वेच्या दिवा-मुंब्रा या रेल्वेस्थानकांदरम्यान २०१९ च्या डिसेंबर महिन्यात कल्याण येथील युवकाचा धावत्या लोकलमध्ये स्टंट करताना नाहक बळी गेला होता. या पार्श्वभूमीवर ठाणे आरपीएफकडे स्टंटबाजीबाबत विचारणा केल्यावर त्यांनी २०१७ ते २०१९ या तीन वर्षांत २६८ गुन्हे दाखल केल्याची माहिती दिली. २०१७ मध्ये अशा प्रकारचे ९८ गुन्हे नोंदवले गेले होते. तो आकडा २०१८ मध्ये २७ ने वाढून या वर्षात १२५ गुन्ह्यांची नोंद झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, २०१९ मध्ये हे प्रमाण थेट ८० ने घसरले आहे. या वर्षात अवघे ४५ गुन्हे दाखल झाले आहेत. या घटना कमी करण्यासाठी ठाणे आरपीएफमार्फत कडक कारवाई करण्याचे धोरण राबवले गेले. याबाबत जनजागृतीवरही विशेष भर दिल्यामुळे ही संख्या कमी झाली आहे. यापुढेही कारवाई आणि जनजागृतीवरही भर देण्यात येणार आहे. अशा प्रकरणांमध्ये कारवाई केल्यानंतर आरोपींना न्यायालयात हजर करून त्यांच्यावर हजारो रुपयांचा दंड आकारण्यात येतो, अशी माहिती आरपीएफच्या सूत्रांनी दिली.ठाणे रेल्वेस्थानकात स्टंटबाजीच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसत आहे. २०१८ पेक्षा २०१९ मध्ये ही संख्या तब्बल ८० ने घटली आहे. या वर्षातही जनजागृती आणि कारवाईवर विशेष भर दिला जाणार आहे. - राजेंद्र पांडव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आरपीएफ ठाणे