पंढरीनाथ कुंभार, भिवंडीपूर्वी पूर्व उपनगरातून पश्चिम उपनगरात रेल्वेने जाण्यासाठी दादरला जावे लागायचे. प्रवाशांसाठी खरोखरच तो द्राविडी प्राणायाम होता. प्रवाशांचा त्रास वाचवण्यासाठी दिवा-वसई मेमू सेवा सुरू झाली. साधारण पाऊण तासात प्रवासी वसई किंवा दिव्याला पोचू लागल्याने या सेवेला चांगला प्रतिसाद मिळू लागला. मोठा फेरा वाचल्याने वेळेची बचत होऊ लागली. खास करून गुजरातला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही पर्वणीच ठरली. रेल्वेने सोय करून दिली मात्र प्रवाशांची संख्या वाढल्यानंतर गाड्यांच्या, फेऱ्यांच्या संख्येत वाढ करायला हवी होती. पण मागणी होऊनही त्यात प्रशासनाने लक्षच घातले नाही. दोन गाड्यांत भरपूर अंतर असल्याने गर्दीच्यावेळी गाडीत चढणे ही तारेवरची कसरतच असते. पूर्वीच्या दिवा-वसई आणि आताच्या पनवेल-डहाणू मार्गावर कोपरनंतर भिवंडी हे महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. सध्या त्याचा विस्तार, विकास सुरू आहे, पण तो प्रवाशांसाठी नव्हे, तर डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसाठी. या मार्गाकडे राजकीय नेत्यांचे, खास करून खासदारांचे दुर्लक्ष असल्याने येथील सुविधा वाढत नाहीत. गाड्या-त्यांच्या फेऱ्या वाढत नाहीत, असा प्रवाशांचा आरोप आहे. या मार्गाला उपनगरी दर्जा देण्यात आला, पण आजतागायत लोकल सुरू झालेली नाही.भिवंडी रेल्वे स्थानकाचे उद््घाटन १९८१ ला झाले. ३५ वर्षात भिवंडी परिसरात- ग्रामीण भागात मोठ्या संख्येने उद्योगधंदे उभे राहिले. त्यामुळे रेल्वे प्रवासी वाढले. त्या प्रमाणात फेऱ्या वाढतील, अशी प्रवाशांची अपेक्षा होती. ती फोल ठरली. रेल्वेमार्ग ज्यांच्या क्षेत्रातून जातो, त्या चार खासदारांनीही निराशा केली.हा मार्ग दुपदरी झाला. पण माफक बदल वगळता फेऱ्या वाढल्या नाहीत. येथील गोदामांत मुंबई, पनवेल, कर्जत, डहाणू परिसरातून कामगार येतात. रोज आठ हजारांपेक्षा अधिक प्रवाशांची ये-जा होते. त्या तुलनेत स्थानकात सोयी नाहीत. मेमू गाडीत चढायला जागा मिळावे यासाठी प्रवासी फलाटाच्या उलट्या दिशेला रूळावर उतरतात. अशी वेळ येऊनही रेल्वे फेऱ्या वाढवत नाही. दिवसभरात दोन्ही दिशेने सातच फेऱ्या होतात. त्यामुळे तातडीने लोकल सुरू करा ही प्रवाशांची मागणी आहे. दिवा-वसई रेल्वे सुरू झाली. आता तो मार्ग पनवेल-डहाणू असा विस्तारला. त्याला उपनगरी मार्गाचा दर्जा देत रेल्वेने दरवाढीचे उखळ पांढरे केले. पण लोकल सोडा, मेमूच्या फेऱ्याही वाढवलेल्या नाहीत. पश्चिम रेल्वे आणि गुजरातला जाणाऱ्या प्रवाशांची मार्गावर मोठी गर्दी आहे. तरीही रेल्वे या मार्गाकडे ढुंकून पाहात नाही. लोकप्रतिनिधी त्याकडे लक्ष देत नाहीत. यातील भिवंडी स्थानक कोपरनंतर सर्वाधिक गर्दीचे असूनही ते गैरसोयींचे आगार बनले आहे. १भिवंडी शहर आणि परिसरात आलेला कामगारवर्ग हा परप्रांतातून आला आहे. त्यामुळे स्टेशनबाहेरील दोन्ही आरक्षण खिडक्यांवर तिकीटे काढण्यासाठी कामगारांची गर्दी असते. तेथे छत नसल्याने उन्हात, वाऱ्या-पावसात प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. तसेच महिला व ज्येष्ठांसाठी वेगळी रांगेची सोय नसल्याने गर्दीत त्यांची ससेहोलपट होते. त्यामुळे आरक्षणाच्या खिडक्यांमध्ये वाढ करण्याची त्यांची मागणी आहे. २अनेक दलाल आरक्षणासाठी आपली माणसे पाठवून त्यांच्याकडून तिकीटे काढून घेतात. ही मंडळी नंतर तिकिटांची जास्त दराने विक्री करतात. ते बेकायदा असले तरी कोणावरच कारवाई होत नाही. त्यामुळे हा काळा धंदा अव्याहत सुरू राहतो. त्यावर कोणाचेच नियंत्रण नाही. पूर्वी टपाल कार्यालयात रेल्वेच्या तिकिटे मिळत. पण काही दलालांनी, त्यांच्या माणसांनी या कार्यालयातील काऊंटरच्या काचा फोडल्याने तेथील आरक्षण सुविधा बंद करण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे भिवंडी रोड रेल्वे स्थानकाबाहेरील आरक्षण खिडकीवरच प्रवाशांची गर्दी होते. ३स्टेशनमास्तरांच्या कार्यालयांत उद््घोषणा प्रणाली आहे. पण उद््घोषक नाही. त्यामुळे शिपायापासून ते आॅपरेटरपर्यंत कुणीही गाडीची उद््घोषणा करतो. रेल्वे स्थानकात सहा स्पिकर असले तरी त्यांचा आवाज सर्वत्र पोचत नाही. येथे १३१ दिवे व २१ पंखे आहेत. त्याची नियमित दुरूस्ती होत नसल्याने काही पंखे व दिवे बंद आहेत. त्यामुळे फलाट्चाया काही बागात अंधार असतो. या सर्व गैरसोयींकडे प्रवाशांनी स्टेशनमास्तर मीना यांचे लक्ष वेधले असता ते थातूरमातूर उत्तरे देऊन प्रवाशांना मार्गी लावतात.
भिवंडीच्या रेल्वे प्रवाशांना हव्यात लोकल
By admin | Published: June 19, 2017 5:03 AM