लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड -दहिसर वरून भाईंदर पर्यंत येणारी मेट्रो हि मुर्धे व राई भागाशी जोडून राई - मुर्धा दरम्यान सुमारे ३२ हेक्टर जागेत प्रस्तावित मेट्रो कारशेड उभारण्यास गुरुवारी महापालिकेत झालेल्या बैठकीवेळी स्थानिक नागरिकांच्या संघटना कडून विरोध करण्यात आला. त्यामुळे आधी विकास आराखड्यातील रस्त्याला विरोध केल्या नंतर आता मेट्रोला होणाऱ्या विरोधा मुळे पेच निर्माण झाला आहे.
मीरा भाईंदर मेट्रो ९ हि दहिसर पूर्व ते भाईंदर अशी येणार असून त्याचे काम देखील जोरात सुरु आहे . भाईंदरच्या सुभाषचंद्र बोस मैदाना पर्यंत आधी हि मेट्रो होणार होती. परंतु सदर मेट्रो मार्गिकेसाठी कारशेड भाईंदर येथे उभारण्याचा निर्णय झाल्या नंतर एमएमआरडीए ने कारशेड साठी भाईंदरच्या मुर्धा व राई दरम्यानची सुमारे ३२ हेक्टर इतकी जागा प्रस्तावित केली आहे. त्यामुळे मेट्रो राई गाव पर्यंत जोडली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
या भागात सर्वेक्षण आणि जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरु करण्या बाबत कार्यवाही सुरु करण्याचे प्रस्तावित असून गुरुवारी महापालिका मुख्यालयात त्या बाबत आयुक्त दिलीप ढोले यांच्या उपस्थितीत एमएमआरडीचे अधिकारी , पालिका अधिकारी , स्थानिक नगरसेवक व स्थानिकांच्या संस्थेचे प्रतिनिधी आदींची बैठक झाली.
त्यावेळी पालिका विकास आराखड्यातील ३० मीटर प्रस्तावित रस्त्याच्या मार्गावरूनच मेट्रोची मार्गिका नेली जाणार असल्याने मुर्धा व राई मेट्रोशी जोडले जाईल . परंतु सदर प्रस्तावित रस्त्याला स्थानिकांच्या संघटनेने विरोध करून त्याचे काम बंद पाडले होते . जेणे करून ठेकेदाराने देखील काम सोडून दिले व एमएमआरडीने देखील काम गुंडाळून टाकल्याने सदर रस्ता अर्धवट अवस्थेत पडून आहे.
आता त्याच रस्त्याचा आधार घेऊन मेट्रो मार्ग जाण्यास बैठकीत विरोध करण्यात आला. सदर मार्गात स्थानिकांची घरे व जागा जाणार असल्याचे कारण विरोधा मागे सांगण्यात आले. कारशेडच्या प्रस्तावित जागेत स्थानिक शेतकरी आजही भातशेती लावत आहेत. एमएमआरडीएने स्थानिकांना विश्वासात न घेता व कोणतीच पूर्वसूचना न देता मेट्रो व मेट्रो कारशेड जाहीर करणे गैर असून स्थानिकांच्या सहमती शिवाय व संपूर्ण माहिती दिल्या शिवाय सर्वेक्षण करण्यास विरोध असल्याचे भूमिपुत्र सामाजिक समन्वय संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
त्यामुळे बैठकीत ह्या बाबत शनिवारी राई गावात संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक ग्रासमथांच्या प्रतिनिधींसह ज्यांच्या जागा जाणार आहेत ते शेतकरी , नगरसेवक , एमएमआरडीएचे अधिकारी आदींची हि संयुक्त बैठक होणार आहे. त्या बैठकीत सर्वाना प्रस्तावित कारशेड , मेट्रो मार्ग आदींची माहिती दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.