लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: शिवसेना असेल किंवा भाजपचे असतील त्यानुसार ज्येष्ठ नेते जेव्हा निर्णय घेतात, तेव्हा आमच्यासारख्या गल्लीतील नेत्यांनी आपल्या मर्यादा ओळखायला हव्यात आणि त्या मर्यादा सांभाळून बोलायला हवे, असा सल्ला शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी भाजपचे आमदार संजय केळकर यांना दिला आहे. आज सत्तेचा फायदा अनेकांना झालेला असून, रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्री झाल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
रविवारी ठाण्यात भाजपच्या वतीने आयोजित मेळाव्यात भाजपचे आमदार संजय केळकर यांनी ठाणे आणि कल्याण भाजपचाच असल्याचा दावा केला होता. त्यानंतर यावर म्हस्के यांनी मत व्यक्त केले आहे. खासदार श्रीकांत शिंदे हे तरुण खासदार आहेत, हजारो, करोडो रुपयांची कामे त्यांनी त्यांच्या मतदारसंघात केली आहेत, रेल्वेचे प्रश्न मार्गी लावले आहेत. आपले मुख्यमंत्री असताना टीका करणाऱ्यांनी आपल्या मतदारसंघात काय केले? याचे उत्तर द्यावे, असा टोलाही त्यांनी चव्हाण यांचे नाव न घेता लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने गेल्या १० महिन्यांपासून केलेली कामे आणि आलेली सत्ता या गोष्टी बहुतेक केळकर यांना पटलेल्या दिसत नाहीत, त्यांच्या बोलण्यातून आणि कृतीतून नेहमी हे दिसून येत असल्याचेही ते म्हणाले. परंतु, केळकर यांचे बोलणे फारसे गांभीर्याने घेणे योग्य नसल्याचेही ते म्हणाले.
दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील : सरनाईक
सन २०१९ ला लोकसभा निवडणुकीत कल्याण आणि ठाणे या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते. तेव्हा सेना - भाजप युतीचे मिळून ४२ खासदार राज्यातून लोकसभेत गेले होते. त्यामुळे यावर भाष्य करणे उचित होणार नसल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. यावर दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. त्यावर स्थानिक पातळीवर कोणीही कुरघोडी करणे अयोग्य असल्याचे मत सरनाईक यांनी व्यक्त केले. ठाण्यातील नालेसफाई तसेच रस्त्यांची कामे याबाबत सरनाईक यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. दरम्यान, मंत्रिमंडळातील समावेशाबद्दल त्यांनी थेट बोलणे टाळले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मी ३० वर्षांपासून काम करत आहे. ते दिलेला शब्द पाळणारे व्यक्तिमत्व आहे, परिणामी दिलेला शब्द ते पाळतील, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.