ठाणे : त्सुनामीसारख्या आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वांना घाम फुटला असून, अजूनही तो कायम आहे. असे असले तरी राज्य शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे ठाणे जिल्ह्यात गेल्या २० दिवसांत नव्या रुग्णांची संख्या गडगडताना दिसत आहे. दिवसाला नव्या सापडणाऱ्या पाच किंवा साडेपाच हजार रुग्णांची संख्या आता पावणेदोन ते दोन हजारांवर आली आहे, तर दुसरीकडे या आजाराला हरवून याच दिवसात जवळपास ७८ हजार कोरोनाबाधित उपचार घेऊन सुखरूप घरी गेले आहेत.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. त्यातच शहरी भागात बेडसाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना तारेवरची कसरत करावी लागली. त्यानंतर रेमडेसिविर इंजेक्शनसाठी धावाधाव सुरू झाली. त्याच्या तुटवड्याने रुग्णांच्या नातेवाईकांसह प्रशासनाच्या तोंडाला फेस आला. हे संकट डोक्यावर घोळत असताना पुन्हा नव्या संकटाने दरवाजा ठोठावला. ते संकट ऑक्सिजनच्या कमतरतेचे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेबरोबर प्रशासनासमोर नवे संकट उभे राहिले. त्यातच काळ्या बाजाराची झळ बसण्यास सुरुवात झाली. याचदरम्यान सरकारने निर्बंध घातले. पण, त्यानंतर अखेर लॉकडाऊन करून कडक निर्बंध घातले. त्याचा रिझल्ट काही दिवसांत दिसण्यास सुरुवात झाली आहे. २३ एप्रिलला जिल्ह्यात पाच हजार ९२ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. ती रुग्णसंख्या आठ दिवसांनी दिवसाला तीन हजार ३८४ वर आली. रुग्णांचा गडगडता आलेख पाहून लॉकडाऊन पुढे १५ दिवसांनी वाढविण्यात आला. त्यामुळे रुग्णसंख्येत घट होऊन ती ९ मे रोजी दिवसाला एक हजार ७५२ वर आली आहे.
धोरण ठरले प्रभावी२० दिवसांत रुग्णसंख्येत घट, तर दुसरीकडे कोरोनाला हरवणाऱ्यांची संख्या ७७ हजार ७८४ने वाढली. त्यामुळे शासनाने लॉकडाऊनचे राबविलेले धोरण प्रभावी ठरताना दिसत आहे.
अशी घटली रुग्णसंख्याएकीकडे वाढणाऱ्या रुग्णांमुळे संकटाचा सामना सुरू असताना कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही वाढू लागली. २३ एप्रिलला मात करणाऱ्यांची संख्या तीन लाख ७७ हजार ५७८ होती. ती २९ एप्रिलला चार लाख ८ हजार ३६५ झाली, तर ९ मेला चार लाख ५५ हजार ३६२ झाली.