डोंबिवली: देशात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु करण्यात आलं होतं, यामध्ये भारतीय रेल्वेनेही सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वे सेवा बंद केल्या, पण लॉकडाऊनमध्ये तिकीट बुकींग सुरु ठेवल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. लॉकडाऊन संपल्यानंतर प्रवाशांनी इच्छितस्थळी जाण्यासाठी पैसे देऊन तिकीट खरेदी केल्या. पण रेल्वे कधी सुरु होणार याची माहिती अद्याप कोणालाच नाही.
रेल्वेकडून प्रवाशांनी बुकींग केलेल्या तिकीट रद्द करुन त्याचा परतावा प्रवाशांना देण्याचा निर्णय घेतला, मात्र यामध्येही रेल्वेचा गलथान कारभार समोर येत आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत रेल्वे प्रवाशांच्या रद्द झालेल्या तीकीटाचे पैसे परत मिळवण्यासाठी ठाणे स्थानकात फलाट क्रमांकाबाहेरील तिकीट खिडकीवर शनिवारी पहाटे सहा वाजल्यापासून प्रवाशांनी रांग लावली होती. ते काम सुरू असतांना अचानकपणे कोणतीही सूचना न देता दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ती खिडकी बंद करण्यात आली, त्यामुळे त्रस्त प्रवाशांनी ठाणे स्थानकात स्टेशन मॅनेजर कार्यालयासमोर गर्दी करून संताप व्यक्त केला आणि जाब विचारला.
रेल्वे तीन महिने बंद असून प्रवासी त्रस्त असून त्यांनी काढलेल्या परंतु लॉकडाऊनमुळे रद्द झालेल्या तिकिटांच्या निधीचा परतावा घेणे गरजेचे आहे. प्रवाशांनी शांत, संयम दाखवून रांग लावली असताना त्यांना कोणतीही सूचना न देता खिडकी बंद करणे योग्य नसल्याचे मत झेडआरयुसीसीच्या सदस्य वंदना सोनवणे यांनी सांगितले. त्याना ही समस्या कळताच त्यांनी तातडीने ठाणे स्थानकात जाऊन वस्तुस्थिती समजावून घेतली, आणि रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली.