लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या टाळेबंदीचा ठाणे जिल्हयासह राज्यातील लाखो सलून व्यावसायिकांना फटका बसला आहे. अनेकांवर त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या व्यावसायिकांना सोशल डिस्टसिंग तसेच स्वच्छतेचे नियम पाळून आपला व्यवसाय सुरु करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी श्री संत सेना पुरोगामी नाभिक संघाचे संतोष राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील नाभिक समाजाचा पंरपरागत असणारा केसकर्तनाचा (सलून) व्यवसाय पूर्णत: बंद आहे. नाभिक हा रोजंदारीवर व्यवसाय करून तुटपंज्या पैशावर घरगाडा चालवित असतो. दुकानच बंद असल्याने राज्यातील अशा असंख्य नाभिक कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. या परिस्थितीचा गांभीर्यांने विचार करून या समाजाला मदत मिळावी. त्याबरोबरच सलून व्यवसाय सुरु करण्यास परवानगी मिळावी. तसेच प्रत्येक कारागिराला वीस हजारांचे अनुदान, लाईट बिल, पाणी बिल मालमत्ता कर यातून सूट मिळावी, प्रत्येक दुकानदाराला एक लाखांची नुकसानभरपाई देण्यात यावी, व्यवसायासाठी नवीन कर्जाची त्वरीत उपलब्धता, सलून व्यावसायिकांचे सर्व प्रकारचे कर्ज शासनाने माफ करावे तसेच या व्यवसायिकांना शासनाने योग्य प्रकारचे कोरोनाव्हायरस आजारावरील योग्य प्रशिक्षण द्यावे. शासनाने त्यांना पीपीई किट द्यावीत, कामगारांना पाच लाखाचे हेल्थ कव्हर आणि २५ लाखाचे लाइफ इन्शुरन्स संरक्षण मिळावे, आदी मागण्यांचा समावेश या निवेदनातून राऊत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत.