ठाणे : लॉकडाउनमुळे घोड्यांसह त्यांच्या मालकांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. पालघरमध्ये काही घोड्यांचा उपासमारीने मृत्यू झाला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे एसपीसीए या पशू- पक्षीप्रेमी संस्थेने दानशूर व्यक्तींच्या मदतीने आतापर्यंत ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यांतील १७५ घोड्यांसाठी ३००० किलो खाद्यपदार्थ (कुट्टी आणि भुसा ) मोफत दिले आहे. यामध्ये ठाण्यातील घोड्यांची संख्या १०० आहे.
लग्न आणि मुंज यासारखे कार्यक्रम एप्रिल ते जून या महिन्यांत जास्त असतात. याच महिन्यात घोडेमालक वर्षभराची कमाई करतात. त्यातून ते कुटुंबांसह घोड्यांचेही पोट भरतात. मात्र, यंदा कोरोनाचे संकट मार्चमध्ये ओढवल्याने गेल्या काही दिवसांत लॉकडाउनची परिस्थिती आहे. यामध्ये घोडेमालकांच्या कमाईचा हंगाम निघून गेला. त्यामुळे त्याना त्यांच्या कुटुंबासह घोड्यांना सांभाळणे कठीण झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच, मध्यंतरी पालघर जिल्ह्यात घोड्यांचा उपासमारीने मृत्यू झाला होता. या गंभीर बाबीकडे काही दानशूर व्यक्तींनी लक्ष वेधून ठाणे एसपीसीए या संस्थेच्या मदतीने कडबा कुटी आणि भुसा या खाद्याचे मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला या संस्थेने पालघर येथील १५ घोडेमालकांच्या ७५ घोड्यांना ८०० किलो खाद्याचे मोफत वाटप केले. त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील २० घोडेमालकांच्या १०० घोड्यांना २२०० किलो खाद्य वाटप केले आहे.सरकारनेही करावी मदतसंस्थेने अशाप्रकारे त्या घोडेमालकांना मदतीचा हात देऊन त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असून त्यांना सरकारने ही मदत करावी, अशी मागणी या संस्थेच्या वतीने पशुपक्षी डॉक्टर सुहास राणे यांनी केली आहे. हे मोफत खाद्यवाटप संस्थेच्या शकुंतला मुझुमदार, देवाशीष मुझुमदार, ममता गिरत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.