कुमार बडदे
मुंब्रा : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे बेरोजगार झालेले शहरातील विविध क्षेत्रातील कामगार मूळगावी जाण्याच्या तयारीत आहेत मूळगावी गेल्यानंतर शेती किंवा शेतात काम करण्याचा किंवा शेतीपुरक व्यवसाय करण्याचा निर्धार गावी जाण्याच्या तयारीत असलेल्या अनेकांनी व्यक्त केला आहे. यामुळे शेतीला भविष्यात पुन्हा सुगीचे दिवस येऊ शकतात.
अनेक वर्षे मुंबई तसेच आजूबाजूच्या उपनगरांमध्ये काम करणारे बाधकाम क्षेत्रातील बिगारी, प्लंबर, मिस्त्री तसेच इतर क्षेत्रातील कामगार लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यापासून गावी जाण्यासाठी आतूर झाले होते. परंतु, सर्वच प्रकारची वाहतूक व्यवस्था ठप्प होती. यामुळे परतण्याची इच्छा असलेल्यांना त्याच्या मूळगावी जाता आले नाही. लॉकडाउनच्या तिसºया टप्प्यात मात्र कामगारांना त्यांच्या मूळगावी जाता यावे, यासाठी सध्या सरकारकडून अंमलबजावणी सुरू आहे. या अंतर्गत बिहारमध्ये गावी जाण्यासाठी मुंब्रा पोलीस ठाण्यासमोरील जैन मंदिराच्या मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात कामगार जमले. मंदिरासमोर जमले कामगार : मुंब्य्रातील जैन मंदिरासमोर कामगारांचा मोठा समूह जमला. त्यांचे प्रमुख नारायण गुप्ता, एम. कुमार आणि त्यांच्या पथकातील इतर सदस्यांनी मूळगावी जाऊन शेतात काम करण्याचा आणि त्याद्वारे आपल्या कुटुंबांचे भरणपोषण करण्याचा निर्धार व्यक्त केला.