ठाणे : कळव्यात कोरोनाचा १० तर मुंब्य्रात २ रुग्ण सापडले. त्यामुळे मंगळवार पासून कळवा आणि मुंब्रा संपूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहे. या भागातील मेडीकल दुकाने वगळता इतर सर्वच अत्यावश्यक सेवाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. या लॉकडाऊनला पहिल्याच दिवशी कळव्यात चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. मात्र मुंब्य्रात अत्यावश्यक सेवा बंद असतांनाही रस्त्यावरील नागरीकांची वर्दळ मात्र कमी झाली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे मुंब्य्रातील नागरीकांना याचे गांभीर्य नसल्याचे दिसून आले. कोरोनाचे केंद्रबिंदू आता कळवाच ठरले असून कळव्यातील विटावा परिसरात कोरोनाचा रु ग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे ठाणे शहरात सर्वाधिक कोरोना पॉसिटीव्ह रु ग्णांची संख्या ही कळव्यात असून ही संख्या आता १० वर जाऊन पोचली आहे. सुरु वातीला पारिसक नगरमध्ये कोरोनाचा पहिला रु ग्ण सापडल्यानंतर हे प्रमाण इतके वाढेल याची कल्पना देखील प्रशासनाला नव्हती. मात्र हा आकडा झपाट्याने वाढत असून आता संपूर्ण कळवाच लॉकडाऊन करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. कळव्यात ज्या-ज्या ठिकाणी कोरोनाचे रु ग्ण सापडले आहेत त्या इमारती आणि परिसर देखील सील करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. यामध्ये मनिषा नगर, कळव्यातील एक खाजगी हॉस्पिटल, मनीषा नगर मधील एक चाळ आणि इतर काही परिसर सील करण्यात आले असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. कळव्यात आजपासून पूर्णत: लॉकडाऊन करण्यात आले असून त्याला अखेर नागरीकांनी प्रतिसाद दिला आहे. या भागातील अनेक रस्ते मोकळे दिसत होते. फेरीवाले, भाजीवाले, अत्यावश्यक सेवा देणारी किराणा मालाची दुकाने देखील बंद होती. दरम्यान कळवा प्रमाणेच मुंब्रा देखील पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे येथील मेडीकल वगळता इतर अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. परंतु तरी देखील नागरीक हातात पिशव्या घेऊन रस्त्यावर फिरतांना दिसत होते. तसेच अनेक गल्लीबोळातूनही नागरीकांची तेवढीच वर्दळ दिसत होती. रस्त्यावर वाहने देखील धावतांना दिसत होती. गरज नसेल तर घराबाहेर पडू नका असे आवाहन करण्यात आले असतांनाही नागरीक मात्र घराबाहेर पडतांना दिसत होते. त्यामुळे अजूनही मुंब्य्रातील रहिवाशांना याचे गांभीर्य नसल्याचेच दिसून आले आहे. कळवा, मुंब्रा भागात रस्त्यावर काही कारण नसतांना फिरणाऱ्या वाहनांवर देखील आता जप्तीची कारवाई पोलिसांकडून केली जात आहे.
- कळवा आणि मुंब्रा परिसरात भाजी मार्केट, किराणा मालाची दुकाने देखील पूर्णपणे बंद करण्यात आले असून पुढील आदेश मिळेपर्यंत हे भाजी मार्केट बंद राहणार आहे. त्यामुळे या काळात नागरीकांना काही हवे असल्यास त्या वस्तु त्यांना घरपोच देण्यासाठी पालिकेच्या वतीने कळवा आणि मुंब्य्रातील दुकानांची, दुधवाल्याची, भाजी विक्रेत्यांची यादी नंबरसह सोशल मिडियावर प्रसिध्द करण्यात आली आहे. यावर फोन करुन ज्या वस्तु हव्या असतील त्या दिल्या जातील असेही सांगण्यात आले आहे.
- वृदांवन मधील इतर रहिवाशांची चाचणी सुरु
वृंदावन भागात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर आता या भागातील ५०० मीटर पर्यंतचा परिसर सील करण्यात आला आहे. त्यानुसार येथील पाच ते सात इमारती देखील सील करण्यात आल्या आहेत. आता येथील रहिवाशांची तपासणी देखील पालिकेच्या माध्यमातून सुरु झाल्याची माहिती देण्यात आली आहे.