लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : सोनाराकडून सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करू न नऊ लाख ७० हजार रुपायांचा गंडा घालणाऱ्या तोतया पोलीसाला बेड्या ठोकण्यात मानपाडा पोलिसांना यश आले. मिलिंद ऊर्फ पवन सावंत असे त्याचे नाव आहे. कल्याण न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.सवई सिंग बोराणा (रा. घाटकोपर) या सोनाराचे पूर्वेतील दावडीतील तुकाराम चौक येथे धनलक्ष्मी ज्वेलर्स आहे. आॅगस्ट २०१६ मध्ये सावंत त्यांच्या दुकानात आला. या वेळी त्याने पोलिसांचा गणवेश घातला होता. मी मुंबई पोलीस दलात रुजू झालो आहे. मला वरिष्ठ व कनिष्ठ अधिकाऱ्यांना दागिने भेट द्यायचे आहेत, असे सांगून त्यांच्याकडून सावंत याने नऊ लाख ७० हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने घेतले. या मोबदल्यात त्याने त्यांना धनादेश दिला. मात्र, तो बाऊन्स झाल्याने बोराणा यांनी सावंतशी संपर्क साधला. मात्र, त्याने पैसे देतो, असे सांगत होता. काही दिवसानंतर तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. त्यानंतर त्याने पैसे देण्यासाठी बोराणा यांना विमानतळ तसेच विविध ठिकाणी बोलावले. मात्र, तो कधीच आला नाही. वर्षभरानंतरही पैसे न मिळाल्याने त्यांनी सावंतविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याआधारे पोलिसांनी सावंतविरोधात गुन्हा नोंदवला. दुकानातील सीसीटीव्ही फुटेज, वर्णनानुसार व बँक खात्याच्या माहितीच्या आधारे त्याचा फोटो मिळवून त्याचा सोध घेत मंगळवारी रात्री बेड्या ठोकल्या. दरम्यान, सावंतने किती सोनार आणि नागरिकांना गंडा घातला आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
तोतया पोलिसाला घातल्या बेड्या
By admin | Published: July 06, 2017 5:54 AM