ठाणे : ठाणे महागनगर पालिकेत मतदारांवर लादली जाणारी राजकीय पुढाऱ्यांची घराणेशाही, टक्केवारीच्या भ्रष्टाचारात अडकलेली व्यवस्था आणि शहराचा झालेला इस्कोट अशा विविध समस्यांवर आता ठाणेकर मतदारांना उतारा मिळणार आहे. ठाण्यातील भ्रष्ट राजकीय आणि शासकीय व्यवस्थेशी लढा देणारे काही दक्ष नागरिक एकत्र आले आहेत. विविध संघटना आणि पक्षांमधील या नागरिकांनी एका छताखाली येऊन ठाणे मतदाता जागरण अभियान तयार केले असून या अभियानातून लोकांमधून लोकांनी सुचवलेल्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उभे केले जाणार आहे. येथील गडकरी रंगायतनच्या आवारात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात ठाणे महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरु आहे. याच धर्तीवर आता ठाण्यातील काही संघटनाही एकत्र येताना दिसत आहेत. अशा संघटनानी एकत्र येऊन या निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांमध्ये जाऊन या संघटना मतदानाबद्दल जनजागृती करणार आहेत. त्याचसोबत सर्व प्रभागांमध्ये जाऊन थेट लोकांमधूनच उमेदवार निवडणार आहेत. त्यानंतर लोकांनी सुचिवलेल्या या स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांचा हे जनजागर अभियानाचे कार्यकर्ते प्रचार आणि त्याचे काम करणार आहे. किमान ५० उमेदवार या माध्यमातून उभे राहतील अशी माहिती या अभियानाचे अध्यक्ष अनिल शाळीग्राम यांनी दिली. ठाण्यातील बिघडलेली घडी पत्रकार, वकील, डॉक्टर, साहित्यिक आणि इतर क्षेत्रातील जाणकार व्यक्तींमार्फत लोकांसमोर मांडून त्यांनीच सुचिवलेल्या या उमेदवारांचा प्रचार केला जाणार आहे. ठाणेकर मतदारांनी त्यांचे उमेदवार सुचवावेत, आम्ही त्यांचा प्रचार करू असे अध्यक्ष आवाहन आयोजकांनी केले आहे. यावेळी सुनील कर्णिक, संजीव साने, वंदना शिंदे, वकील राजय गायकवाड, उन्मेष बागवे, निशिकांत दासूद, जगदीश खैरालिया, डॉ. मेहता आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
प्रस्थापितांना शह देण्यासाठी ठाण्यात ‘लोक उमेदवार’
By admin | Published: January 11, 2017 7:22 AM