ठाणे : लोकसभेच्या ठाणे, कल्याण व भिवंडी मतदारसंघांतील निवडणुकीकरिता सोमवार, २० मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होत असून, तब्बल ६६ लाख ७६ हजार ८३७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
ठाणे मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे व महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्यासह २४ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. कल्याण मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे व महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर-राणे यांच्यासह २८ उमेदवार रिंगणात आहेत. भिवंडी मतदारसंघात महायुतीचे उमेदवार कपिल पाटील, महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्यामामा) व अपक्ष उमेदवार नीलेश सांबरे यांच्यासह २७ उमेदवार रिंगणात आहेत. गेल्या किमान महिनाभरापासून या तिन्ही मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मेळावे, रॅली, सभा यांच्या माध्यमातून प्रचार केला आहे. काही उमेदवारांनी आपले जाहीरनामे, वचननामे प्रसिद्ध केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी सभा घेऊन वातावरण ढवळून काढले. आता मतदारांनी मतदानाचा कौल देण्याचा क्षण आला आहे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे याकरिता निवडणूक यंत्रणेने जनजागृती केली. सामाजिक संस्था, प्रमुख व्यक्ती यांनीही मतदानाचे कर्तव्य बजावण्याचे आवाहन केले आहे. लोकसभा निवडणुकीचे आणखी दोन टप्पे बाकी असून, मंगळवार, ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे.
मतदार केंद्रांवर काय सुविधा असतील?
ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघांत सहा हजार ६०४ मतदान केंद्र आहेत. मतदानासाठी येणाऱ्या मतदाराला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी विविध सुविधा प्रशासनातर्फे करण्यात आल्या आहेत. यामध्ये अखंडित वीजपुरवठा, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय, स्वच्छतागृह, रॅम्प, दिव्यांगांसाठी व्हिलचेअर, पाळणाघर, ६३३ ठिकाणी मंडपात मतदान केंद्र, बसण्यासाठी खुर्च्या तसेच आरोग्य सुविधाही उपलब्ध आहेत.
प्रमुख उमेदवार-
ठाणे - राजन विचारे (उद्धवसेना) नरेश म्हस्के (शिंदेसेना)
कल्याण - डाॅ. श्रीकांत शिंदे (शिंदेसेना)
वैशाली दरेकर (उद्धवसेना)
भिवंडी कपिल पाटील (भाजप) सुरेश म्हात्रे (शरद पवार गट) नीलेश सांबरे (अपक्ष)
किती ईव्हीएम लागणार?
ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लोकसभा मतदारसंघांत सहा हजार ६०४ मतदान केंद्रे असून, सर्व मतदान केंद्रांसाठी १३ हजार २०८ बॅलेट युनिट, १३ हजार २०८ कंट्रोल युनिट, १३ हजार २०८ व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत. याशिवाय प्रत्येक मतदान केंद्रावर १० टक्के बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट आरक्षित ठेवण्यात आली आहेत.
निवडणूक विभाग सज्ज -
जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी या तिन्ही लाेकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २० मे राेजी जिल्ह्यातील सहा हजार ६०४ मतदान केंद्रांवर मतदान हाेणार आहे.
त्यासाठी लागणारे मतदान यंत्र प्रत्येक मतदान केंद्रांवर पाेहोच करून मतदानाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक लाेकसभा मतदारसंघात सहा विधानसभांचा समावेश असून त्यांच्या मतदान केंद्रांवर प्रत्येकी दाेन मतदान यंत्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यावर ६६ लाख ७६ हजार ८३७ मतदारांच्या मतदानाची व्यवस्था केली आहे.