अजित मांडके, ठाणे : ठाणे लोकसभा निवडणुकीचा आता प्रचाराचा शेवटचा दिवस आला असून या दिवशी ठाण्यात बाईक रॅलीचा धुराळा उडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नरेश म्हस्के यांच्यासाठी तर राजन विचारे यांच्यासाठी उध्दव सेनेचे आदित्य ठाकरे हे बाईक रॅली काढणार आहेत. तर याच दिवशी दुपारी ठाण्यात प्रथमच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. नाराज भाजपच्या पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्यात फडणवीस यांना पाचारण करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
ठाणे लोकसभेत पहिल्यांदा दोन शिवसैनिकांमध्ये सरळ लढत होत आहे. राजन विचारे हे या मतदार संघातून दोन वेळा निवडून आले आहेत. परंतु आता त्यांची लढत त्यांच्याच पक्षात असलेल्या मात्र आता वेगळी चुल मांडलेल्या नरेश म्हस्के यांच्या सोबत होत आहे. विचारे यांच्या नावाची घोषणा आधी झाल्याने त्यांच्या प्रचाराच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. दुसरीकडे नरेश म्हस्के यांचे नाव अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी जाहीर झाले. असे असले तरी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या जोरावर प्रचारात धुराळा उडविला आहे. त्यात आता सोमवारी निवडणुक होणार आहे. त्यानुसार शनिवारी सांयकाळी पाच वाजता निवडणुक प्रचाराचा धुराळा थंडावणार आहे.
परंतु शेवटच्या क्षणही वाया जाऊ न देता दोनही पक्षाकडून त्याचा फायदा घेतला जाणार आहे. त्यानुसार ठाण्यात राजन विचारे यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे यांची बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील म्हस्के यांच्यासाठी बाईक रॅली काढणार आहेत.
मागील लोकसभा निवडणुकीत देखील अशा पध्दतीने शेवटच्या दिवशी शिंदे यांनी बाईक रॅली काढली आणि चित्र बदलले दिसून आले होते. त्यामुळे आता कोणाची बाईक रॅली सरस होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे शनिवारी दुपारी २ वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत ते आता काय बोलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच पक्षातील नाराजांना देखील ते कानमंत्र देणार आहेत. त्यामुळे या शेवटच्या सभेकडे ठाणेकरांच्या नजरा लागल्या आहेत.