ठाणे : ठाण्यात निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशी लढाई होणार आहे. परंतु, विरोधकांना अद्याप उमेदवार मिळत नसेल तर मला वाटते त्यांनी मला बिनविरोध निवडून द्यावे, असा टोला ठाणे लोकसभा मतदारसंघातील उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
गुरुवारी शिवजयंतीचे औचित्य साधून ठाण्याच्या मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विचारे यांनी प्रचाराला सुरुवात केली. यावेळी त्यांच्यासोबत इंडिया आघाडीतील काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई उपस्थित होते.
विचारे म्हणाले की, आजच्या पवित्र दिवशी या ठिकाणी इंडिया आघाडीचे सर्व कार्यकर्ते नतमस्तक झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. त्यावेळेस सर्व जाती-धर्माचे लोक, बारा बलुतेदार, १८ पगड जातींना महाराजानी एकत्र करून हिंदवी स्वराज्य निर्माण केले.
त्याच पद्धतीने आज या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण करायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन आपल्याला पुढे जावे लागेल. ज्या पद्धतीने सर्व पक्ष फोडण्याचे काम सुरू आहे तसेच भ्रष्टाचारी लोकांना जवळ करण्याचे काम केले जात आहे. त्यास जनता कंटाळली आहे, अशी टीका त्यांनी भाजप सरकारचे नाव न घेता केली.