नितीन पंडित, भिवंडी: भिवंडी लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपसह महायुतीच्या घटक पक्षांनी एकत्र येऊन जोरदार शक्ती प्रदर्शन केले. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह आमदार किसन कथोरे ,महेश चौघुले,शांताराम मोरे,विश्वनाथ भोईर,दौलत दरोडा,निरंजन डावखरे,माजी आमदार नरेंद्र पवार ,शिवसेना उपनेते प्रकाश पाटील,कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमोद हिंदुराव,शिवसेना शहर प्रमुख सुभाष माने,भाजपा शहराध्यक्ष अँड हर्षल पाटील,संतोष शेट्टी,मनसे प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेश चव्हाण यांसह महायुतीतील घटक पक्षातील हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला खासदार कपिल पाटील यांनी पुष्पहार अर्पण केले.त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभास्थळी उपस्थित होत मार्गदर्शन करताना केंद्र व राज्यातील महायुतीच्या डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून राज्यात दोन वर्षात सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे.त्यामुळे पुन्हा विजय आपलाच आहे. त्यासाठी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मतदानाची टक्केवारी वाढीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.
त्यांनतर प्रचार रॅली वंजारपट्टी नाक्याच्या पुढे आली असता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रॅलीत हजेरी लावत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. भिवंडी लोकसभा क्षेत्राच्या विकासासाठी राज्य व केंद्र सरकारने भरभरून दिले असून भिवंडीसारख्या शहरात मेट्रोचे काम प्रगतीपथावर असल्याचे फडणवीसांनी सांगितले. त्यानंतर उपविभागीय कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांच्या कडे कपिल पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.