जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात कायदा सुव्यवस्था ठेवण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर असून, नागरिकांनी निर्भयपणे मतदान करण्यासाठी ठाणे नगर पोलिसांनी शुक्रवारी 'रूट मार्चचे आयोजन केले होते. नागरिकांनी निर्धास्तपणे आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशानुसार, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी पायी रुट मार्चचे आयोजन केले होते. हा रूटमार्च ठाणेनगर पोलीस ठाणे येथून संध्याकाळी ५.३० वाजता सुरु झाला. चिंतामणी चौक, जांभळी नाका, कौपिनेश्वर मंदिर, जवाहर बाग अग्निशमन केंद्र, दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह, महागिरी कोळीवाडा, शासकीय विश्रामगृह येथे रूटमार्च समाप्त झाला. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख, पोलीस अधिकारी, अमलदार, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे ( सीआयएसएफ) अधिकारी, तसेच राज्य राखीव दलाचे अंमलदार यांनी रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे यांनी दिली.