कल्याण : ठाणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघांतील सर्वच उमेदवारांनी प्रारंभी विकासाची भाषा केली असली, तरी आता सर्वच राजकीय पक्ष ‘जाती’वर गेले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने आगरी फॅक्टर चर्चेत आणल्यामुळे माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांच्यासह काही आगरी समाजातील नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन १९७७ पासून आगरी समाजाने युतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्याचा दावा केला, तर ठाण्यात आगरीसेनेचे प्रमुख राजाराम साळवी यांनीही पत्रकार परिषद घेऊन शिवसेना-भाजप महायुतीला पाठिंबा जाहीर केला.शिवसेना आमदार सुभाष भोईर, माजी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, कल्याण तालुकाप्रमुख एकनाथ पाटील, स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, ठाणे महापालिकेचे उपमहापौर रमाकांत मढवी, कल्याण शिवसेना शहरप्रमुख विश्वनाथ भोईर, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे आदींनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील हे आगरी उमेदवार असून आगरी समाजाची ताकद दाखवून देण्याची शेवटची वेळ आहे, असे आवाहन त्यांनी केले आहे. मात्र, आगरी समाज कोणत्याही एका पक्षाच्या मागे नाही. १९७७ पासून दोनवेळा रामभाऊ म्हाळगी, त्यानंतर जगन्नाथ पाटील, दोनवेळा राम कापसे, चारवेळा प्रकाश परांजपे, दोनवेळा आनंद परांजपे आणि एकवेळा श्रीकांत शिंदे हे खासदार म्हणून निवडून आलेले आहे. केवळ शांताराम घोलप यांचा कार्यकाळ वगळता आगरी समाज युतीच्या बाजूने राहिला आहे, असे पाटील म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी २७ गावे वगळण्याचा शब्द पाळला नाही, म्हणून संघर्ष समिती बाबाजी पाटील यांच्या बाजूने उभी ठाकली आहे, याकडे जगन्नाथ पाटील यांचे लक्ष वेधले असता, मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द नक्कीच पाळतील. हा विषय न्यायप्रविष्ट असल्याने त्यांच्याकडून निर्णय घेण्यात आलेला नाही, असे ते म्हणाले. नेवाळी आंदोलनानंतरही शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न सुटला नाही, असे विचारले असता हा प्रश्न नक्कीच सोडवला जाईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, आगरी समाजाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे.भाजप-शिवसेना महायुतीला पाठिंबा देत असल्याचे आगरीसेनेचे प्रमुख राजाराम साळवी यांनी ठाण्यातील पत्रकार परिषदेत जाहीर केले. युवा आगरीसेनेचे प्रमुख राहुल साळवी, आगरीसेनेचे उपाध्यक्ष कैलास पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
लोकसभा निवडणूक: सर्वच राजकीय पक्ष अखेर ‘जाती’वर उतरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 2:32 AM