लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीमधून महाराष्ट्रामध्ये अत्यंत चुरशीची लढत दिसून येत आहे. त्यातही शिंदे गट आणि ठाकरे गटाचे उमेदवार आमने सामने असलेल्या मतदारसंघांमध्ये ही चुरस आणखीच वाढलेली दिसत आहे. मात्र ठाकरेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता दिसत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये ठाण्यातून शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनी आघाडी घेतली आहे. तर विद्यमान खासदार राजन विचारे हे पिछाडीवर पडले आहेत.
मतमोजणीच्या आतापर्यंत समोर आलेल्या कालांनुसार शिंदे गटाच्या नरेश म्हस्के यांना ३८६९९ मतं मिळाली आहेत. तर राजन विचारे यांना ३११७४ मतं मिळाली आहेत. आतापर्यंतच्या कलांनुसार नरेश म्हस्के हे ७५२५ मतांनी आधाडीवर आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अटीतटीचा सामना सुरू आहे. तसेच आतापर्यंत समोर आलेल्या ४८ जागांच्या कलांमध्ये महायुती २४ आणि महाविकास आघाडी २२ जागांवर आघाडीवर आहे. तर इतर २ जागांवर आघाडीवर आहेत. पक्षनिहाय जागा पाहायच्या झाल्यास महाराष्ट्रात भाजपा १६, ठाकरे गट ९, काँग्रेस ८, शरद पवार गट ५ आणि अजित पवार गट एका जागेवर आघाडीवर आहे.