ठाणे/कल्याण/भिवंडी : ठाणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघांतील मतमोजणी केंद्रांबाहेरील कडक पोलीस बंदोबस्त, अंग पोळून काढणारा उन्हाळा आणि २५ ते ३० फेऱ्यांचे सव्यापसव्य यामुळे बहुतांश कार्यकर्त्यांनी सकाळी व दुपारी पक्ष कार्यालयात बसून निकाल पाहणे पसंत केले. पक्ष कार्यालयांपाशी दुपारनंतर बॅन्जोच्या तालावर कार्यकर्ते थिरकले. मात्र, सायंकाळी उशिरा मतमोजणी केंद्रातून विजयी उमेदवार बाहेर पडताच गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर घेतले आणि पक्षाचे झेंडे नाचवत विजयोत्सव साजरा केला.मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात कार्यकर्त्यांना प्रवेश नव्हता. ज्यांच्याकडे प्रवेशाचा पास होता, त्यांनाच आत प्रवेश दिला जात होता. अन्य कार्यकर्ते, पत्रकार व हवशेगवशे यांना पोलीस हुसकावून लावत होते. त्यातच, सकाळी ११ नंतर ऊन चढायला लागल्याने मतमोजणी केंद्राबाहेरील कार्यकर्त्यांची पांगापांग झाली. काहींनी जवळील हॉटेल किंवा इमारतींच्या सावलीत आडोसा घेतला, तर काहींनी चक्क काढता पाय घेतला. बहुतांश कार्यकर्ते पक्ष कार्यालयांमध्ये बसून दूरचित्रवाहिनीवर निकाल पाहत होते. ठाण्यात शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे हे मतमोजणी केंद्रावर आले व त्यानंतर थोड्या वेळाने पालकमंत्री एकनाथ श्ािंदे हेही दाखल झाले. आपण पराभवाच्या छायेत असल्याची कुणकुण लागताच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे हे नजीब मुल्ला यांच्यासोबत दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास निघून गेले. विचारे यांच्या विजयाच्या जल्लोषात शिंदे व आ. प्रताप सरनाईक हेही सहभागी झाले. शिवसैनिकांनी विचारे व सरनाईक यांना उचलून घेतले होते. शिवसेना झिंदाबादच्या घोषणा ते देत होते.भाजपच्या ठाण्यातील कार्यालयाबाहेर बॅन्जोवर भाजपचे कार्यकर्ते थिरकत होते. यावेळी आ. संजय केळकर व आ. निरंजन डावखरे हजर होते. यावेळी आंबे कापून त्यांनी कार्यकर्त्यांचे तोंड गोड केले गेले. कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुसंडी मारल्याचे दिसताच शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेबाहेर शिवसैनिकांचे सेलिब्रेशन सुरू झाले. मात्र, मतमोजणी केंद्राबाहेर शुकशुकाट होता. दुपारी पाऊण वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांनी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला व ते चक्क रिक्षातून निघून गेले. या मतमोजणी केंद्राबाहेर ५० ते १०० शिवसैनिक आणि हाताच्या बोटांवर मोजण्याएवढे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सकाळपासून हजर होते. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी केंद्र हे महामार्गालगत रणरणत्या उन्हात असल्याने तेथेही शुकशुकाट होता. तेथील एका पेन्डॉलखाली आ. नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सुमारे ५०० कार्यकर्ते हजर होते. या ठिकाणी निकालाच्या घोषणेचीही व्यवस्था केली नव्हती. कपिल पाटील हे येथे उशिरा दाखल झाले व उशिरा त्यांच्या विजयाचा गुलाल उधळला गेला.मुंबईमुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघावर वर्चस्व सिद्घ करीत शिवसेना-भाजपने देशाच्या आर्थिक राजधानीवर कब्जा केला. काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी उद्योगपतींचा पाठिंबा व सोशल मीडियाचा प्रचार याद्वारे विजयाची हवा निर्माण केली. परंतु तळागाळातील प्रचार आणि सुप्त मोदी लाटेमुळे शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत विजयी झाले. काँग्रेससाठी अनुकुल मानल्या जाणाºया दक्षिण मध्य मतदारसंघातून शिवसेनेचे राहुल शेवाळे सलग दुसऱ्यांदा विजयी झाले. मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून विद्यमान खासदार पूनम महाजन यांनी बाजी मारत माजी खासदार प्रिया दत्त यांचा पुन्हा पराभव केला. ‘भाऊ’ या टोपन नावाने परिचित असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी दुसºयांदा विजय मिळवून मतदारसंघावरील आपली पकड सिद्ध केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्या उमेदवारीमुळे चर्चेत आलेल्या उत्तर मुंबईत गोपाळ शेट्टी यांनी बाजी मारली.रायगडरायगड, रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून सहा वेळा निवडून आलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व केंद्रीयमंत्री अनंत गिते यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी अटीतटीच्या लढतीत पराभव केला. तटकरे यांनी २० फेरीपर्यंत गीतेंच्या सात हजार मताधिक्याला छेद देत तब्बल आठ हजार मतांची आघाडी घेतली. त्यानंतर तटकरे यांनी मागे वळून पाहिले नाही. ३० व्या फेरीमध्ये तटकरे यांनी ३१ हजार ४३८ मते अधिक घेत गीतेंचा पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसकरिता शेजारील मावळ मतदारसंघात पार्थ पवार यांच्या पराभवाने धक्कादायक निकाल लागत असतानाच तटकरे यांच्या विजयाने राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिलासा लाभला. मागील निवडणुकीत शेकापचा उमेदवार रिंगणात असल्याने तटकरे यांना पराभव पत्करावा लागला होता. यावेळी शेकापच्या नेत्यांनी तटकरे यांची पाठराखण केल्याने त्याचा मोठा फायदा सुनील तटकरे यांना झाला.पालघरशिवसेना - भाजप युतीचे उमेदवार राजेंद्र गावित हे ८८,८८३ मतांनी पालघर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांना ५,८0,४७९ तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी बविआचे बळीराम जाधव यांना ४,९१,५९६ तर तिसरे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश पाडवी यांना १३,७२७ मते मिळाली. विशेष म्हणजे या मतदारसंघात तिसºया क्रमांकाची मते ‘नोटा’ची २९ हजार ४७९ आहेत. जेमतेम सहा महिन्यांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाकडून गावीत विजयी झाले होते. वाटाघाटीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यानंतर भाजपने गावीत यांनी उमेदवारी देण्याची गळ शिवसेनेला घातली होती. बविआने गावीत यांच्यापुढे मोठे आव्हान निर्माण केले होते. तरीही त्यावर मात करीत गावीत पुन्हा विजयी झाल्याने पहिल्यांदाच पालघर लोकसभेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यात उद्धव ठाकरे यशस्वी ठरले आहेत.
लोकसभा निवडणूक 2019 : उन्हाच्या झळांमुळे सायंकाळी थिरकले कार्यकर्ते
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 3:38 AM