लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून शिंदेसेनेचे इच्छुक मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण यांनी माघार घेतली व ती जागा भाजपला मिळाली. नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांनी माघार घेतल्याने शिंदेसेनेचे हेमंत गोडसे यांना ही जागा मिळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आता सामंत बंधूंच्या त्यागाची भरपाई म्हणून ठाणे शिंदेसेनेला मिळणार की, नाशिक गोडसेंना सुटल्याने ठाण्यावर भाजप दावा करणार, अशी चर्चा सुरू आहे.
पालघरवर पाणी सोडून ठाणे राखण्याचा पर्याय शिंदेसेनेकडे आहेच. नाशिकमधून अजित पवार गटाचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी निवडणूक लढवावी, अशी भाजपची इच्छा होती. शरद पवार यांच्या दरवाजापर्यंत गेलेल्या महादेव जानकर यांना भाजपने आपल्याकडे खेचून आणले व परभणीतून उमेदवारी दिली. यापूर्वी मराठा आरक्षण देऊन मराठा मतांच्या आधारे मैदान मारण्याचा प्रयत्न भाजपने केला होता.
- याआधी ओबीसींची नाराजी भाजपला महाग पडल्याने माळी, धनगर, वंजारी (माधव) समीकरण वसंतराव भागवत यांच्या काळापासून भाजपने जुळवले. - यावेळी लोकसभेत भुजबळ, जानकर व पंकजा मुंडे यांना उमेदवारी देऊन त्याच ‘माधव’ फॉर्म्युलाचा वापर करण्याचे प्रयत्न सुरू होते; मात्र नाशिकमधील शिंदेसेनेचे हेमंत गोडसे हे उमेदवारीकरिता आग्रही होते. त्यामुळे भुजबळ यांनी माघार घेतली.- नाशिक सोडल्याने ठाणे मतदारसंघ भाजप आपल्याकडे खेचणार की रत्नागिरी-सिंधुदुर्ग भाजपकडे गेल्याने शिंदेसेनेच्या पदरात ठाणे पडणार, याचीच चर्चा आता सुरू आहे. - ठाण्यात शिंदेसेना व भाजप दोन्ही पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असली तरी एक-दुसरा अपवाद वगळता सक्षम उमेदवार नाही. पालघरमध्ये खा. राजेंद्र गावित यांनी गेल्यावेळी शिवबंधन बांधून निवडणूक लढवली. त्यांना यावेळी भाजपतर्फे निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे पालघरच्या बदल्यात शिंदेसेना ठाणे आपल्याकडे राखू शकते.