लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असतांना रक्तदानाचे महानकार्य करुन लोकमत आणि ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी रक्ताचे नाते निर्माण करण्याचे काम केले आहे. रक्तदानाचा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते मंगेश देसाई यांनी शुक्रवारी केले.लोकमतचे संस्थापक तथा स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त सध्या राज्यभर रक्ताचे नाते उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. ठाण्यातही लोकमत आणि ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने १६ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ या दरम्यान तीन हात नाका येथील उपायुक्त कार्यालय येथील सभागृहात या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी ‘महाराष्टÑाची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री शिवाली परब आणि वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.देसाई पुढे म्हणाले, अप्रत्यक्षपणे प्रत्येकाचे एकमेकांशी रक्ताचे नाते असते. रक्ताची बांधिलकी असते. त्यामुळे आपण एकमेकांशी चांगले वागतो. परंतू, आपण रक्तादान करतो, गरजू व्यक्तीला ज्यावेळी आपले रक्त जाते. त्याला जीवदान मिळते, त्यावेळी खऱ्या अर्थाने रक्ताचे नाते निर्माण होत असते. हे नाते निर्माण करण्याचे काम ‘लोकमत’ परिवाराने केले आहे. सध्याच्या कोरोनासारख्या गंभीर परिस्थितीमध्ये रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. त्यामुळे कोणालाही संधी मिळेल, तसे रक्तदान करा, असे आवाहनही त्यांनी केले.तर शिवाली परब हिने या उपक्रमाचे कौतुक करीत लोकमतचे आभार मानले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडूनही लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणून उद्योग व्यवसाय हळू हळू सुरु करण्यात येत आहेत. परंतू, नागरिकांनीही कोरोनाचे नियम पाळले पाहिजे, असे आवाहन तिने केले.* रक्तदानाच्या उपक्रमाला पोलिसांची संख्या मोठी होती. इतके पोलीस प्रथमच पाहिल्याने आपल्याला काहीसे दडपण आल्याची प्रांजळ कबूली शिवालीने यावेळी दिली. वाहतूक पोलिसांमुळेच वाहतूक कोंडी असूनही आपण कार्यक्रमाला पोहचू शकल्याचे तिने मान्य केले.* विशेष म्हणजे भर पावसातही नागरिक आणि पोलिसांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सहायक पोलीस निरीक्षक टी. डी. सकुंडे, गृहरक्षक दलाचे जवान सिद्धार्थ जाधव यांच्यासह २८ पोलीस कर्मचारी तर रिक्षा चालक आणि रस्ता सुरक्षा स्वयंसेवकांसह १६ नागरिक अशा ४४ दात्यांनी यावेळी रक्तदान केले. लोकमतचे उपाध्यक्ष अनिरुद्ध हजारे हेही यावेळी उपस्थित होते.
रक्ताचे नाते निर्माण करण्याचे काम ‘लोकमत’ आणि वाहतूक पोलिसांनी केले- मंगेश देसाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 12:21 AM
राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असतांना रक्तदानाचे महानकार्य करुन लोकमत आणि ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी रक्ताचे नाते निर्माण करण्याचे काम केले आहे.
ठळक मुद्दे२८ पोलिसांसह ४४ दात्यांनी केले रक्तदान