बदलापूरला पूर्व आणि पश्चिमेला जोडण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल हा एकमेव रस्ता असून पर्यायी रस्ते सध्या बंद आहेत. त्यामुळे या रस्त्यावर दिवसभर वाहनांची वर्दळ सुरूच असते. या उड्डाणपुलाचे काम मास्टिक अस्फाल्ट या तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आले होते. या रस्त्याची पाच वर्षांची लेखी हमीदेखील देण्यात आली होती. मात्र, दोनच वर्षात या रस्त्याची पुरती दुरवस्था झाली. त्यानंतर बदलापूर पालिकेतर्फे या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. मात्र, दोनच दिवसांत या रस्त्यावर टाकलेली खडी मातीदेखील पावसामध्ये वाहून गेली आणि पुन्हा एकदा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले. या उड्डाणपुलावरील खड्ड्यांचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत पालिका प्रशासनाने खड्डे पडलेल्या उड्डाणपुलावर डांबरीकरण केले आहे. आता हा रस्ता पुन्हा एकदा वाहनचालकांसाठी सुरळीत सुरू झाला आहे. त्यामुळे वाहनकोंडीची समस्यादेखील कमी झाली आहे.
--------