कल्याण : राज्य सरकारने अटी आणि शर्थींसह रविवारपासून सलून आणि ब्युटी पार्लर सुरू करण्यास परवानगी दिली आहे. परंतु, केडीएमसीने या संदर्भात कोणतेही आदेश अथवा सूचना दिलेल्या नव्हत्या. त्यामुळे दुकाने उघडली तर कारवाई होऊ शकते, या भीतीमुळे कल्याणमध्ये बहुतांश ठिकाणी सलून बंदच होती. दरम्यान ‘लोकमत’च्या ‘रिपोर्टर आॅन द स्पॉट’मध्ये ‘केडीएमसीच्या आदेशाची प्रतीक्षा’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध होताच त्याची दखल केडीएमसीने घेत सलून चालू करण्यासंदर्भातील आदेश सोमवारी जारी केले. कन्टेंनमेंट झोनमध्ये मनाई करताना सम-विषम तारखेप्रमाणे इतर ठिकाणी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत व्यवसाय सुरू करण्यास अटी व शर्थींवर परवानगी दिली आहे.
केस कापणे, रंगविणे, वॅक्सिंग, थ्रेडींग करणे आदी सेवा देता येतील. मात्र, त्वचा संदर्भातील कोणत्याही सेवा देता येणार नाही, अशी बाब दुकानाच्या बाहेर ठळकपणे नमूद करणे बंधनकारक केले आहे. सलूनमधील कामगारांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हातमोजे, अॅप्रन व मास्क वापरणे बंधनकारक आहे. दुकानातील सर्व खुर्च्या, कामाचे टेबल, डेस्क इत्यादी बाबींचे प्रत्येक ग्राहकांच्या सेवेनंतर निर्जंतुकीकरण करावे तसेच एकत्रित बसण्याची जागा व ठिकाणांचे दोन तासांनी निर्जंतुकीकरण करावे. ग्राहकांच्या सेवेसाठी डिस्पोजेबल टॉवेल अथवा नॅपकीन यांचा वापर करावा. प्रत्येक ग्राहकानंतर नॉन डिस्पोजेबल वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. दरम्यान, अटी-शर्थींचे पालन न केल्यास दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही या आदेशात नमूद केले आहे.