डोंबिवली: येथिल मानपाडा रोडवरील रातोरात टाकण्यात आलेले गतीरोधक अवैध असून ते नेमके कोणी, कशासाठी आणि का टाकले याबाबतची सत्यता पडताळण्याचे काम कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अभियंत्यांनी करावी, आणि संबंधितांवर काय कारवाई करणार याची माहिती द्यावी अशी मागणी महापालिकेचे सभागृह नेते राजेश मोरे यांनी केली.मोरे यांनी ‘लोकमत’च्या हॅलो ठाणेमधील डोंबिवलीचे ते गतीरोधक ठरताहेत जीवघेणे या वृत्ताची दखल घेत त्या जीवघेण्या गतीरोधकाची बुधवारी पाहणी केली. त्या पाहणी दरम्यान मानपाडा रस्त्यावर गावदेवी मंदिराजवळच्या दोन्ही दिशेकडील रस्त्यांवर तीन गतीरोधक शनिवारी रात्रीत टाकण्यात आले, त्यानंतर तेथे ६ अपघात झाले, परिसरातील एका दुकानदाराने त्याबाबत विचारणा केली असता, ज्येष्ठ नागरिकांची मागणी असल्याचे सांगण्यात आले. मोरे यांनी या माहितीच्या आधारे केडीएमसीचे डोंबिवली विभागीय कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यावर ते गतीरोधक अवैध असून कोणी टाकले याची चौकशी सुरु असून पाटील तसे लेखी आदेश काढणार असल्याचे मोरे म्हणाले. चुकीच्या पद्धतीने गतीरोधक टाकण्यात आले असून त्याची उंची नियमानूसार नाही, हे मोरे यांनी महापालिका अधिका-यांच्या नीदर्शनास आणले. त्यांनी फुटपट्टी घेत गतीरोधकाची उंची मोजली, त्यात ती उंची योग्य नसल्याचे त्यांना जाणवले, त्यांनी तशी माहिती महापालिकेला दिली.पाटील यांच्याशी लोकमतने संपर्क साधला असता त्यांनीही सदरहू गतीरोधक अत्यंत चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आले असून त्याची चौकशी सुरु आहे. त्यासंदर्भात शहर वाहतूक नियंत्रण विभागाशी संपर्क साधणे, त्यांना तेथे गतीरोधकाची आवश्यकता आहे की नाही ते विचारणे, नसेल तर ते काढुन टाकणे, तसेच जर आवश्यकता असेल तर त्याची योग्य ती डागडुजी करणे आदी तांत्रिक बाबींची स्पष्टता करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे ते म्हणाले.दरम्यान अपघातग्रस्त जसुमती मेस्त्री यांची प्रकृति स्थिर असून दोन दिवसात त्यांच्या डाव्या हाताच्या कोपराची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यांचे पती रमेश मेस्त्री हे मात्र त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. ते म्हणाले की, जर अवैधपणे गतीरोधक टाकलेत आणि, त्याची महापालिका दप्तरी नोंद नसेल तर या महापालिकेत किती अनागोंदी कारभार सुरु आहे हे स्पष्ट होते. असा मनमानी कारभार करणा-यांवर महापालिका, सत्ताधारी नेते काय कारवाई करणार हे स्पष्ट करावेत. तसेच ते कोणाच्या सांगण्यावरुन टाकले त्यांनी कुटूंबियांच्या औषधोपराचा खर्च द्यावा, नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही केली.
लोकमत इम्पॅक्ट : डोंबिवलीचे ते गतीरोधक अवैध? चौकशी व्हावी - राजेश मोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 5:43 PM
डोंबिवली येथिल मानपाडा रोडवरील रातोरात टाकण्यात आलेले गतीरोधक अवैध असून ते नेमके कोणी, कशासाठी आणि का टाकले याबाबतची सत्यता पडताळण्याचे काम कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अभियंत्यांनी करावी, आणि संबंधितांवर काय कारवाई करणार याची माहिती द्यावी अशी मागणी महापालिकेचे सभागृह नेते राजेश मोरे यांनी केली.
ठळक मुद्दे गतीरोधकांची उंची नियमानूसार नाही केडीएमसी अभियंत्यांचाही दुजोरा