नितिन पंडीत
भिवंडी - भिवंडी तालुक्यातील शेलार ग्रामपंचायतीने उभारलेल्या ५० बेडच्या कोविड केअर सेंटरला अखेर जिल्हाधिकारी डॉ राजेश नार्वेकर यांनी गुरुवारी मंजुरी दिली. या कोविड केअर सेंटरला मंजूर दिली नसल्याने दै लोकमतने वारंवार बातम्यांच्या माध्यमातून हा मुद्दा उचलून धरला होता. अखेर जिल्हा प्रशासनाने या कोविड केअर सेंटरला मंजुरी दिली आहे.
शेलार ग्रामपंचायत सरपंच किरण चन्ने यांनी शेलार येथील जिल्हा परिषद शाळेत ५० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारले आहे. सर्व सुविधा असलेल्या या कोविड केअर सेंटरला ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी मनीष रेंगे यांच्यासह जिपचे आरोग्य व बांधकाम समिती सभापती कुंदन पाटील यांनी स्वतः भेट देऊन या कोविड केअर सेंटरची प्रशंसा केली होती. त्याच बरोबर आवश्यक त्या शासकीय परवानग्या देखील ग्राम पंचायतीने घेऊन अंतिम मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हे प्रकरण पडून होते.
महामारीच्या काळात जिल्हा प्रशासनाने कोविड केअर सेंटरला मान्यता न दिल्याने शेलार ग्राम पंचायतीचे सरपंच किरण चन्ने यांनी जिल्हा प्रशासनावर प्रचंड नारानी व्यक्त करीत उपोषणाचा इशारा दिला होता. त्याच बरोबर या कोविड सेंटरच्या संदर्भात बातम्या दै लोकमत मध्ये प्रसिद्ध झाल्याने अखेर जिल्हा प्रशासनाला जाग आली व जिल्हाधिकारी डॉ राजेश नार्वेकर यांनी गुरुवारी सायंकाळी या कोविड केअर सेंटरला परवानगी दिली.
कोविड सेंटरमुळे शेलारसह पंचक्रोशीतील कोरोना रुग्णांना फायदा होणार असल्याने लवकरच या केंद्राचे लोकार्पण करण्यात येणार असून सेंटर उभारण्यापासून ते मान्यतेपर्यंत सहकार्य करणाऱ्या सर्व यंत्रणांसह दै लोकमतचे देखील शेलारचे सरपंच किरण चन्ने यांनी विशेष आभार मानले.