ठाणे - डोंबिवली येथून रोज पहाटे 6 वाजून 14 मिनिटांनी सुटणारी डोंबिवली सीएसएमटी ही लोकलकल्याण यार्डात उभी असते, कल्याणकर प्रवासी त्यातूनच बसून येतात, त्यामुळे या ठिकाणच्या हजारो प्रवाशांना ती लोकल सुविधा असूनही नसल्यासारखीच होती. प्रवाशांनी रेल्वेच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली होती. यासंदर्भात लोकमतच्या हॅलो ठाणेमध्ये मंगळवारी वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्या वृत्ताची सोशल मीडियावर भरपूर चर्चा झाली. त्याची दखल घेत मध्य रेल्वे प्रशासनाने कल्याण येथून रिकामी लोकल डोंबिवलीपर्यंत आणली, आणि त्यामुळे प्रवाशांचा आनंदाला पारावार उरला नव्हता.
या गाडीचे दररोजचे प्रवासी मंदार अभ्यंकर यांनी सांगितले की, लोकमतमध्ये या समस्येचे वृत्त आले, आणि अखेर समस्येचे निराकरण झाल्याचे समाधान प्रवाशांमध्ये आहे. जर कल्याण येथून लोकल भरुन येत आहे हे प्रशासनाला माहिती होते तर त्यांनी यासंदर्भात आधीच कार्यवाही करणे गरजेचे होते. माध्यमांनी आवाज उठवल्यावर त्याची दखल घ्यावी लागते अशी वेळ का यावी असेही अभ्यंकर म्हणाले.
बुधवारी लोकल रिकामी आलेली असली तरीही असा प्रयोग आता येथून पुढे किती दिवस राहतो हे बघणे महत्त्वाचे असल्याचे अन्य सहप्रवाशांनी सांगितले. कल्याणच्या प्रवाशांनीही डोंबिवलीकरांच्या समस्येला प्राधान्य देत लोकलमध्ये आधीच न चढून जागा न व्यापल्यानेही प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. रेल्वे प्रशासनाने दखल घेतली, सुधारणा केली हेच तर अपेक्षित असल्याचे महिला प्रवाशांनी सांगितले. जेथून लोकल सुटते त्या प्रवाशांना प्राधान्य मिळावे ही त्या मागची भावना असून रेल्वेच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
मात्र आज लोकल जरी पूर्ण रिकामी आली असली तरीही ती पंधरा डब्यांची नव्हती, ती 12 डब्यांची होती. त्यामुळे त्याची माहिती प्रवाशांना उद्घोषणा यंत्रावरुन देण्यात आली होती. त्यामुळे काही काळ प्रवाशांची तारांबळ उडाली होती. परंतू जेव्हा रिकामी लोकल स्थानकात आली, तर त्याचीही चर्चा सबंध प्रवासामध्ये होती. त्यामुळे 15 ऐवजी 12 डब्यांची लोकल आल्याची नाराजी फारशी व्यक्त झाली नाही. अशा पद्धतीने डोंबिवली सीएसएमटी लोकल रोज रिकामी यावी येथूनच सुटावी, जेणेकरून इथल्या प्रवाशांची गैरसोय होणार नाही, सकाळच्या वेळेतले नियोजन कोलमडणार नाही अशा चर्चा सुरू आहेत.