भातसानगर : शहापूर तालुक्यातील भातसा नदीच्या कालव्याच्या पाण्यावर घेत असलेली भाताची रोपेच पाण्याअभावी करपून गेल्याने वेहळोली येथील शेतकरी अडचणीत सापडले होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने मंगळवारच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत अधिक वेगाने पाणी सोडून गुरुवारी शेतीला पाणी आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. तालुक्यातील भातसा नदीच्या उजव्या कालव्याजवळ असणाऱ्या गावातील शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेत असतात. पावसाळ्यात जरी उत्पादन कमी आले, तरी त्याची भरपाई शेतकरी उन्हाळ्यात भरून काढतो. यावर्षी अधिक पावसाने भातपिके हातची गेल्याने आता याची थोडीफार भर कालव्याच्या पाण्यातून काढण्याचा प्रयत्न काही शेतकरी करीत असतानाच भातसा धरणाच्या कालव्याचे पाणी येईल, या आशेवर वेहळोली गावातील शेतकऱ्यांनी भातपिकाच्या लागवडीसाठी रोपांची पेरणी केली.
ही पेरणी केली खरी, मात्र शेतीत पाणीच न आल्याने भाताची रोपे जळून गेल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते. कालव्याच्या जवळ असलेल्या वेहळोली गावातील शेतकरी बाळू वेखंडे यांनी पावसाळ्यात हातचे पीक गेल्याने निदान आतातरी कालव्याच्या पाण्यावर थोड्याफार प्रमाणात उपलब्ध पाण्याचा उपयोग करून भाताचे उत्पन्न घेऊ, असा विचार मनाशी बाळगून त्यांनी पेरणी केली. मात्र, ही रोपेच पाण्याअभावी करपून गेल्याने त्यांच्यासह ग्रामस्थांच्या समस्या वाढल्या होत्या. मात्र, बुधवारपासून गावातील चारीला पाणी आल्याने भाताच्या रोपांना जीवदान मिळाले आहे.यासंदर्भात भातसा धरण कार्यालयाशी संपर्क साधला असता भातसा धारणापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या अर्जुनली गावाजवळील कालव्याचा बांध फुटल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. मात्र ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच बांधाचे काम अधिक वेगाने दुरुस्त करून पाणी सोडण्यात आले.कालव्याचे पाणी गावातील चारीला आल्याने आता शेतात पाणी साठायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे रोपे जगून भातपिके घेण्यास नक्कीच उपयोग होणार आहे.- बाळू वेखंडे, शेतकरी