लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ‘लोकमत’ साहित्य महोत्सवाला उद्या, शुक्रवारी ठाण्यातील कोरम मॉल येथे सुरुवात होत आहे. हा महोत्सव २८ ते ३० मार्चदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने आयोजित पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर, गझल गायक भीमराव पांचाळे, कवी व गीतकार प्रवीण दवणे आणि अभिनेते संदीप पाठक यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता कोरम मॉल येथे होणार आहे. रसिक श्रोते व वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या कवी, साहित्यिकांच्या कविता व विचारांची गुढी यानिमित्ताने उभारली जाणार आहे.
‘लोकमत’च्या साहित्य पुरस्कारांचे हे सहावे वर्ष असून, ठाण्यात हा सोहळा होण्याचे तिसरे वर्ष आहे. गतवर्षी ठाण्यातील चोखंदळ वाचकांनी कोरम मॉलमध्ये आयोजित केलेल्या पुस्तक प्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद देत लक्षावधी रुपयांची ग्रंथसंपदा खरेदी केली हाेती. यंदाही वाचकांसाठी मराठी साहित्यातील सकस, कसदार साहित्यकृतींचे प्रदर्शन भरवले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या मनपसंत कवितेने हाेणार आहे. आस्वाद रसिकांना घेता येईल. शुक्रवारी सायंकाळी ठाणे, मुंबईतील गायकांची सांगीतिक तर शनिवारी सायंकाळी ठाणे व परिसरातील कवींच्या कवितांची मैफल याच ठिकाणी आयोजित केली आहे.
सोमवारी रंगनाथ पठारे यांना जीवनगौरव
लोकमत साहित्य पुरस्कार सोहळा येत्या सोमवारी, ३१ मार्च रोजी सायंकाळी ५:३० वाजता टिप टॉप प्लाझा येथे आयोजित केला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याकरिता अथक परिश्रम घेतलेल्या रंगनाथ पठारे यांच्या प्रदीर्घ साहित्यसेवेसाठी त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाईल. यावेळी मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. लोकमत मीडिया लि.चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या निमित्ताने ख्यातनाम समाजसेवक प्रकाश आमटे यांची मुलाखत अभिनेत्री तेजश्री प्रधान घेणार आहेत. टाटा मोटर्स स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्हचे सरव्यवस्थापक व ‘मुंबई बुकीज’ वाचन चळवळीचे प्रमुख शंतनू नायडू यांची मुलाखत हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असेल.