मुंबई : सर्जनशील साहित्याची निर्मिती करत समाजमनाला दिशा देणाऱ्या प्रतिभावान साहित्यिकांचा आज, गुरुवारी ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे होणाऱ्या लोकमत साहित्य पुरस्कार या कार्यक्रमात गौरव करण्यात येणार आहे. या दिमाखदार कार्यक्रमाला साहित्य वर्तुळातील अनेक दिग्गज लेखक, नामवंत प्रकाशक, कला क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच रसिक प्रेक्षक उपस्थित राहणार आहेत.
काही दिग्गज कलावंतांच्या कला सादरीकरणातून कार्यक्रम आणखी खुमासदार होणार आहे. यामध्ये शिल्पा कुलकर्णी आणि त्यांचा चमू शास्त्रीय नृत्याधारित सरस्वती वंदना सादर करणार आहेत. तर, ज्यांच्या कवितांचा भावानुवाद स्वतः गुलजार यांनी केला ते किशोर कदम ‘सौमित्रायन’ नावाचा काव्याविष्कार सादर करतील. कविता ते गाणे अशा प्रवासाची सुरेल मैफल सादर होणार आहे.
प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत, मंगेश बोरगावकर आणि त्यामध्ये कवितांचे सादरीकरण करणार आहेत निर्माता-दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले. ‘दोन विश्वास आमने-सामने’ या अनोख्या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ लेखक आणि माजी सनदी अधिकारी विश्वास पाटील आणि ज्येष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांची मुलाखत प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. तर, वाचन संस्कृती, अनुभूती आणि विचार यावर आधारित एक सादरीकरण अभिनेते वैभव मांगले करतील. कार्यक्रमाची सांगता हेमा नेरळकर यांच्या भैरवीने होणार आहे.
भालचंद्र नेमाडे यांची विशेष मुलाखतलोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यांच्या सन्मान सोहळ्यानंतर भालचंद्र नेमाडे यांचे सुहृद राजेंद्र पाटील त्यांची मुलाखत घेणार आहेत.
लेखकांच्या स्वाक्षरीची पुस्तके खरेदी कराकार्यक्रमस्थळी पुरस्कार विजेत्या लेखकांची पुरस्कार विजेती पुस्तके विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, प्रत्येक स्टॉलजवळ लेखकांसाठी खास आसन व्यवस्था करण्यात आली असून, इच्छुकांना संबंधित लेखकाच्या स्वाक्षरीने पुस्तक खरेदी करता येईल. तसेच, तिथे सेल्फी पॉइंटही उभारण्यात आला आहे.