ठाणे - विठ्ठल कांबळे या तरुणाने त्याच्या डोक्यावर ‘लोकमत’ हे नाव रंगविले होते. तसेच शरीरावर रंगरंगोटी करून महामॅरेथॉनचा टीशर्ट परिधान केल्याचा फिल आणला. त्याला कॅमेऱ्यात टिपण्यासाठी अनेक फोटोग्राफर सरसावले. कांबळे हे आयोजकांचा लोगो आपल्या शरीरावर रंगवितात. रंगरंगोटी करण्यासाठी त्यांना चार तास लागतात. त्यामुळे ते लक्षवेधी ठरतात. आतापर्यंत त्यांनी ३४७ स्पर्धांमध्ये अंगावर रंगवून भाग घेतला आहे.
संरक्षण दलाच्या धावपटूंनी दिली प्रेरणासेनादल, पोलीस, होमगार्ड आणि वनविभाग अशा संरक्षण दलाच्या विशेष 'डिफेन्स' गटातील धावपटूंनी महामुंबई महामॅरेथॉन स्पर्धेदरम्यान सर्वांना तंदुरुस्तीचा संदेश दिला. या गटाच्या पुरुष २१ किमी गटात १०९ टीए मराठा बटालियनमध्ये कार्यरत असलेल्या दीपक कुंभार (मध्यभागी) यांनी बाजी मारली. पालघरच्या वनविभागात कार्यरत असलेल्या शैलेश गंगोडा (डावीकडे) यांनी दुसरे, तर नाशिक रोड कॅम्पच्या आर्टी सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या अविनाश पटेल यांनी तिसरे स्थान मिळवले. महिलांमध्ये, यामिनी ठाकरे (मध्यभागी) यांनी अव्वल स्थान पटकावले. प्रियांका पारिख (डावीकडे) आणि विनिता पाल यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले.
पुण्याहून आले सर्किट रनर पुण्यातील ६९ वर्षीय नरहरी कडेकर हे सर्किट रनर आहेत. ठाण्यातील महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याकरिता ते मुद्दाम पुण्याहून आले होते. त्यांनी आतापर्यंत १० किमीच्या महामॅरेथॉनमध्ये ३६ वेळा सहभाग घेतला आहे. स्पर्धेचे आयोजन उत्तम करण्यात आल्याची प्रतिक्रिया कडेकर यांनी दिली. लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
भावी पोलिसही धावलेशासनाने पाेलिस भरती जाहीर केल्यामुळे राज्यभरात युवक, युवती भरतीसाठीची तयारी करत आहेत. भरतीसाठीच्या परीक्षेमध्ये धावण्याच्या स्पर्धेलाही विशेष महत्त्व. यामुळे पोलिस भरतीची तयारी करणारे शेकडो मुलांनी स्पर्धेत सहभागी होऊन शारीरिक क्षमतांचा अंदाज घेतला. प्रशिक्षणार्थी पोलिसही उत्साहाने स्पर्धेत सहभागी झाले होते.
वनरूपीचे २५ कर्मचारी धावलेवनरूपी क्लिनिकने या स्पर्धेला मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या क्लिनिकचे २५ कर्मचारी या स्पर्धेत धावले. त्यांनी या स्पर्धेत भाग घेऊन चांगल्या आरोग्यासाठी धावणे किती गरजेचे आहे, हेच जणू दाखवून दिले.
त्यांचे १०० स्पर्धक धावले ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय हे रुग्णांची गर्दी असलेले रुग्णालय असून, या रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आदींसह सुमारे १०० कर्मचाऱ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. त्यांनी स्पर्धेत धावून आरोग्याचा संदेश दिला
अख्खे कुटुंब धावले नवी मुंबईतील वकील कृष्णा शिंदे यांच्यासह त्यांचे पती शंंकर शिंदे आणि मुलगा ओम शिंदे या तिघांनी १० किमीच्या स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. कोलशेत परिसरात राहणारे आनंद वर्मा, मुलगा यशराज आणि पत्नी प्रेरणा हे तिघेही धावले. पत्नी पाच किलोमीटर तर मुलगा तीन किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत धावला. दिलीप सोनी आणि त्यांची पत्नी अंकिता यांच्यासह मुलगा आद्रेव यांनी स्पर्धेत भाग घेतला.
मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ
विविध क्षेत्रातील मान्यवरांनी झेंडा दाखवून महामुंबई महामॅरेथॉनला ठाणे शहरात जोरदार शुभारंभ केला. झेंडा दाखवून धावपटूंचा उत्साह उंचावताना दिसले. यात आ. निरंजन डावखरे, उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, महामॅरेथॉनच्या संस्थापिका रुचिरा दर्डा, प्रोकॅम मुंबई मॅरेथॉनचे संस्थापक अनिल सिंग, लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा, वनरुपी क्लिनिकचे संचालक डॉ. राहुल घुले, श्रीमती घुले, ठाणे महापालिकेच्या उपायुक्त (क्रीडा) मीनल पालांडे, ‘श्लोक’च्या संस्थापिका शीतल दर्डा, माजी नगरसेवक संजय वाघुले, ठाणे महापालिकेच्या उपकार्यालय अधीक्षक रीमा देवरुखकर, संगीत संयोजक महेश ओगले, ओम साई आरोग्य केअर प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. खालिद शेख, एनएसजीचे फर्स्ट इन कमांड कर्नल क्रिपाल सिंग, उद्योजक रमेश अग्रवाल, ठाणे जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल, सखी मंचच्या संस्थापिका आशु दर्डा यांचा समावेश होता.
‘लोकमत महामुंबई महामॅरेथॉन’मध्ये सहभागी झालेल्या धावपटूंंचे आभार. संपूर्ण महाराष्ट्रातून धावपटू या महामॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. धावपटूंच्या मनोरंजनासाठी मनोरंजन कक्ष उपलब्ध केले होते. ‘भागो बिनधास्त’ याला साजेसे चित्र धावपटू बिनधास्त पळताना दिसले. पोलिस आणि ठाणे महापालिकेने या महामॅरेथॉनला खूप सहकार्य केले. महामॅरेथॉनला सहकार्य करणाऱ्या विविध संघटना, एजन्सी आणि प्रायोजकांचेही आभार - संजय पाटील, रेस संचालक
‘लोकमत महामुुंबई महामॅरेथॉन’ला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहून खूप आनंद होत आहे. जणू स्वप्न पाहत आहे, असे वाटत आहे. सर्व धावपटू व त्यांच्या पार्टनरचे खूप आभार मानते. या महामॅरेथॉनमधून खूप काही शिकायला मिळाले. नवनवीन गोष्टी घडतात आणि आपण शिकत जातो. ही महामॅरेथॉन यशस्वी करण्याचा १०० टक्के प्रयत्न ‘लोकमत’ने केला - रुचिरा दर्डा, महामॅरेथॉनच्या संचालिका