ठाणे : तीन दिवसांपासून ठप्प असलेली लसीकरणाची मोहीम ठाण्यात पुन्हा एकदा सुरु झाली. सोमवारी लस घेण्यासाठी शहरातील विविध केंद्रांवर पहाटेपासूनच लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी वादंगदेखील झाल्याचे दिसून आले. यात ज्येष्ठ नागरिकांचे मात्र हाल झाले. पहाटेपासून रांगेत उभे राहूनही अनेकांना लस मिळालीच नाही.
मागील काही दिवसांपासून ठाणे महापालिका हद्दीत लसीकरणाचा वेग मंदावला आहे. आठवडाभरात तीन ते चारच दिवस लसीकरण मोहीम पूर्ण क्षमतेने सुरु आहे. मागील आठवड्यातही लसीकरणाला खीळ बसली होती. आता या आठवड्यातदेखील तीच परिस्थिती आहे. तीन दिवस ठाण्यात मोहीम ठप्प होती. सोमवारी पुन्हा मोहीम सुरु झाली. शहरासाठी केवळ १०,५०० लस उपलब्ध झाल्या होत्या. त्यानुसार शहरातील ५४ केंद्रांवर मोहीम सुरु झाली होती. लस घेण्यासाठी ठाणेकरांनी सकाळपासूनच रांगा लावल्याचे दिसून आले. पहाटेपासूनच कोपरी येथील आरोग्य केंद्रावर तसेच शहरातील इतर केंद्रावर नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. लस मिळावी म्हणून प्रत्येकाने लवकर येण्याचा प्रयत्न केला होता; परंतु जिथे १०० लसी सांगितल्या, त्याठिकाणी ७० लसी असल्याचे सांगितले गेले. त्यामुळे अनेक केंद्रांवर गोंधळाचे वातावरण होते. त्यातही काही ठिकाणी टोकन नसलेल्यांना देखील रांगा न लावता लस दिली जात होती. त्यामुळे रांगेतील नागरिक संतप्त झाले होते. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले. सकाळच्या सत्रात कडक उन्हाचा मारा या नागरिकांना सहन करावा लागला. दुपारी १२.३० वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाल्याने पावसाचा माराही नागरिकांना सहन करावा लागला. त्यामुळे अनेक केंद्रावर नागरिकांनी नियोजनाचा अभाव असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली.
आतापर्यंत केवळ ३० टक्केच लसीकरण
ठाण्याची लोकसंख्या २५ लाखांच्या आसपास आहे. त्यानुसार जानेवारीपासून आतापर्यंत महापालिका हद्दीत ३० टक्केच लसीकरण झाले आहे. त्यातही २३ टक्के हे पहिला डोस घेणाऱ्यांचे आणि ७ टक्के लसीकरण हे दुसरा डोस घेणाऱ्यांचे झाले आहेत. त्यानुसार आतापर्यंत पहिला डोस ४ लाख ९ हजार ७० जणांना, तर दुसरा डोस १ लाख ३८ हजार १८९ जणांना देण्यात आला आहे. आतापर्यंत ६ लाख २८ हजार २६८ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.
आज लसीकरण बंद
ठाणे शहरासाठी १०,५०० लस प्राप्त झाल्या होत्या. त्या एका दिवसापुरतीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये ९ हजार ३०० कोविशिल्ड आणि १२०० कोव्हॅक्सिनचा साठा उपलब्ध झाला होता. त्यानुसार महापालिकेने सोमवारी एका दिवसात ५४ केंद्रांच्या माध्यमातून लसीकरण केेले. आता लसींचा साठा संपुष्टात आल्याने मंगळवारी शहरातील लसीकरण बंद राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.