लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : टोल नाक्यांचे माहेरघर म्हणून भिवंडीची नवी ओळख निर्माण झाली आहे. मुंबई, ठाण्यापासून जवळ असलेल्या भिवंडीत ठाणे, वाडा, वसई, नाशिक, कल्याण कुठूनही यायचे झाले तरी टोल भरावा लागतो. सरकारने काही हलक्या वाहनांना काही टोल नाक्यांवर सूट दिल्याने वाहनचालकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, आता केंद्र सरकारने वाहनांना फास्टटॅग लावणे अनिवार्य केल्याने येथील स्थानिक वाहनचालकांसह प्रवासी वाहन चालकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, या फास्टटॅगमुळे टोल कंपनी कर्मचारी व वाहनचालक यांच्यात वादाचे प्रसंग वाढले असून, टोल नाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
पडघा येथे असलेल्या टोल नाक्यावर फास्टटॅगमुळे वाहनांच्या लांबचलांब रांगा लागत असल्याने चालक कमालीचे हैराण झाले आहेत. मात्र, टोल कंपनी केंद्र सरकारचे आदेश पुढे करून नागरिकांकडून टोल वसुली करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेताना दिसतात, तर दुसरीकडे रस्त्याची आवश्यक असलेली कामे, पडलेले खड्डे, अंडरपास अशी अनेक कामे अपूर्ण असतानाही कंपनी टोल वसुलीसाठी फास्टटॅग लावण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करत आहे. पडघा टोल नाक्यावर शनिवार व रविवारी शिर्डी, नाशिककडे जाणाऱ्या व तेथून मुंबईकडे येणाऱ्या वाहनांची गर्दी जास्त असते. ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पडघा टोल नाक्याकडून कोणतीही ठोस उपाययोजना अजूनही करण्यात आली नाही, त्यामुळे प्रवाशांना टोल नाक्यावर एक ते दोन तास ताटकळत राहावे लागते.
या टोल नाक्यावर सुविधांचा अभाव असून आजही रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्याकडे टोल कंपनी दुर्लक्ष करते आहे. मात्र, असे असतानाही टोल वसुलीसाठी फास्टटॅग लावण्यास टोल कंपनी नागरिकांना भाग पाडत आहे, हे चुकीचे आहे. केंद्र सरकार गरिबांकडे दुर्लक्ष करून कोट्यधीश असलेल्या टोल कंपन्यांना पाठीशी घालण्याचे काम करते आहे, ज्याचा फायदा टोल कंपन्या घेत आहेत. पडघा टोल नाक्याचा विचार केला तर या रस्त्यावर आवश्यक असलेली कामे अपूर्ण आहेत. अंडर पास नसल्याने अनेक अपघात होतात त्याकडे कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. फास्टटॅगच्या नावाने नागरिकांकडून सक्तीची वसुली होणार असल्याने अधिवेशनात याविरोधात आपण निश्चितच आवाज उठवणार आहोत, अशी प्रतिक्रिया भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी दिली आहे.
------------------------------------------
स्थानिकांचा टोल भरण्यास विरोध
केंद्र सरकारने वाहनांना फास्टटॅग लावण्याचे सक्तीचे केल्याने पडघा टोल नाक्यावर सध्या सर्व लाइन फास्टटॅगच्या केल्या आहेत. मात्र, स्थानिक नागरिकांचा टोल भरण्यास विरोध असल्याने टोल नाक्यावर अनेक वेळा वादाच्या घटना घडतात. त्यातच फास्टटॅग ऑनलाइन असल्याने स्थानिक वाहन चालकांसाठी सिस्टिम मॅन्युअल करावी लागते. ज्यात ५ ते ६ मिनिटे कालावधी लागतो. त्यामुळे टोल नाक्यावर गर्दी वाढते. विशेष म्हणजे स्थानिकांना टोलमध्ये सूट मिळावी म्हणून स्थानिकांनी गाडीचे पेपर टोल नाक्याकडे जमा केल्यास फक्त १० टक्केच टोल भरावा लागेल, मात्र हा १० टक्के टोल भरण्यासही स्थानिकांचा विरोध असल्याने त्यांची समजूत काढण्यात वेळ वाया जातो. ज्यांच्या जमिनी रस्त्यासाठी बाधित झाल्या आहेत अशांसाठी टोल कंपनी सहानुभूती नक्कीच दाखविणार. मात्र, कुणीही स्थानिक नागरिक म्हणून सांगतो. त्यांच्याकडे पेपर मागितले की पुराव्याचे पेपर देण्यास वाहनचालक टाळाटाळ करतात. सध्या सरकारने नागरिकांना फास्टटॅगसंदर्भात जनजागृतीसाठी एक महिन्याची मुदत दिली आहे. त्यानंतर पोलीस प्रशासनास हाताशी धरून टोल वसुली मोहीम राबविली जाईल. त्यामुळे सर्व नागरिकांनी आपल्या वाहनांना फास्टटॅग लावणे गरजेचे आहे. त्यामुळे टोल नाक्यावरील वेळ वाचेल, असे मत पडघा टोल नाक्याचे व्यवस्थापक बाबूभाई शेख यांनी व्यक्त केले आहे.
------------------------------------------------
कोट
स्थानिक नागरिकांना टोलसंदर्भात सूट मिळावी म्हणून आम्ही आमदार यांच्या कार्यालयात कागदपत्रे जमा केली आहेत; परंतु एक वर्ष होऊनही अजूनपर्यंत आम्हाला पास दिले नाहीत. त्यातच आता टोलवर आमच्या पुढील वाहनचालकाकडे जर फास्टटॅग नसेल तर मागच्या वाहनचालकाचा विनाकारण वेळ जातो. पडघा टोल नाक्यावर वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे.
- तेजस चव्हाण, वाहनचालक
भारत स्वतंत्र होऊन ७३ वर्षे झाली तरीही रस्ते सुधारले नाहीत. फास्टटॅगच्या नावाने नागरिकांची लुबाडणूक सुरू आहे. टोल नाक्यावर अनेक तास रांगा असतात, याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत. हे सरकार तर झोपेचे सोंग घेत असून नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे, ज्याचा त्रास आता सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे.
ॲड. कल्पेश पाटील, वाहनचालक
फास्टटॅग लावल्यानंतर टोल वसुलीत ५० टक्के सवलत मिळायला हवी होती. या सवलतीमुळे वाहनचालकांनी स्वतः फास्टटॅग लावून घेतले असते. उलट फास्टटॅग नसल्याने टोल वसुली दुप्पट करणे चुकीचे आहे.
- संदेश पाटील, वाहनचालक
-----------------------------------------
फोटो आहे