ठाणे : तृतीयपंथी भीक मागतात ते भीक मागायला आले की काम करा असे समाजाकडून सांगून आमच्याकडे तुच्छ नजरेने पाहिले जाते पण तुम्ही आम्हाला काम देणार का? आमच्यातील कलागुण ओळखा, मानवता बघा आमचे जेंडर नको असे कळकळीचे आवाहन तृतीयपंथी समाजातील सामाजिक कार्यकर्ती आणि किन्नर अस्मिता संस्थेची प्रोग्रॅम मॅनेजर सिमरन सिंग यांनी आज ठाण्यात केले.
आम्हाला घरातून बाहेर काढल्यावर जगण्याचा मोठा प्रश्न उभा राहतो. कोणतेही काम मिळत नसल्याने भीक मागण्यांकडे वळावे लागते. तृतीयपंथीमध्ये पण कलागुण आहेत, त्यांच्यात माणुसकी आहे त्यामुळे जेंडर न बघता त्यांच्या कलागुणाकडे पाहण्याचे सिमरनने सांगितले. 'तृतीयपंथीयांचे हक्क हा मानवाधिकार आहे' हा संदेश जनमानसांत बिंबविण्याच्या उद्देशाने ठाण्यात एम स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्यावतीने आणि संकल्प केअर यांच्या सहकार्याने ९ ऑक्टोबर रोजी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. याबद्दल माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषद घेण्यात आली होती. ठाण्यात तृतीयपंथीसाठी ही पहिलीच मॅरेथॉन होणार आहे अशी माहिती एम स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी दिली.
पत्रकार परिषदेला संकल्प केअर चे डॉ. पांडुरंग कदम, अक्षय शक्ती च्या संस्थापिका, उपाध्यक्ष मिनी सुबोथ, किन्नर अस्मिताच्या समाजसेविका सिमरन सिंग यावेळी उपस्थित होते. ठाण्यातील पाचपाखाडी सर्व्हिस रोड येथे 'एक मैल' अंतर्गत दौडचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ते १८, १९ ते २९, ३० ते ४४, ४५ ते ६० या वयोगटातील मुले, मुली, पुरुष, महिला आणि जेष्ठांसाठी एक मैल दौड होणार आहे. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या दौड अंतर्गत तृतीयपंथीयांसाठी ही विशेष मॅरेथॉन स्पर्धा संपन्न होणार आहे. ठाणे जिल्ह्यातून १३५ तृतीयपंथी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रित करण्यात आले आहे. तर या स्पर्धे साठी अंकित स्पोर्ट्स, अमोल कॅटरेस, इंडियन कॉर्पोरेशन चे विशेष सहकार्य लाभले आहे.