लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ: अंबरनाथ पालिकेच्या रखडलेल्या प्रकल्पांपैकी एक म्हणजे चव्हाण खुल्या नाट्यगृहाच्या खाली उभारण्यात येणारे वाहनतळ. सध्या या वाहनतळात वाहने उभीकरणे शक्य होणार नाही. या वाहनतळात पाणी साचल्याने येथे वाहनांऐवजी बेडकांचे वास्तव्य वाढले आहे. साचलेल्या पाण्यात डासांचे प्रमाणही वाढले आहे.पाच वर्षांपूर्वी अंबरनाथ पालिकेने महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून चव्हाण नाट्यगृहाच्या जागेवर वाहनतळ उभारण्याचे काम हाती घेतले. तळ मजल्यावर वाहनतळ व पहिल्या मजल्यावर खुले सभागृह उभारण्यात येणार होते. मात्र, या प्रकल्पाच्या मंजूर आराखड्याप्रमाणे विकास झालाच नाही. दोन वेळा त्याचा आराखडा बदलण्यात आला. त्यातच, कंत्राटदाराने संथगतीने काम केल्याने त्याचा दुहेरी फटका या प्रकल्पाला बसला. कधी प्रशासन तर कधी कंत्राटदारामुळे हे काम पाच वर्षे रखडले आहे.पाच वर्षांनंतर जुन्याच दराने काम करणे कंत्राटदाराला परवडणारे नसल्याने त्यानेही या कामात निकृष्ट बांधकाम साहित्याचा वापर करत हे काम पुढे सरकवण्याचा प्रयत्न केला. तसेच किमान वाहनतळ सुरू करण्याची इच्छा पालिकेची असल्याने ते उभारून देण्याचा प्रयत्नही झाला. मात्र, या वाहनतळाच्या जागेवर आता पाणी साचल्याने त्याचा वापर करणे शक्य होताना दिसत नाही. या ठिकाणी गुडघाभर पाणी साचले असून मोठ्या प्रमाणात कचराही टाकण्यात आला आहे. वाहनतळातील पाणी काढून त्या ठिकाणी पार्किंग सुरू केल्यास किमान त्याचा फायदा पालिकेला होण्यास मदत होईल. सेनेची ठोस भूमिका नाही पालिका अधिकाऱ्यांना या प्रकल्पात कोणताच रस दिसत नसल्याचे समोर येत आहे. सत्ताधारी शिवसेनाही या प्रकरणात कोणतीच ठोस भूमिका घेत नसल्याचे दिसत आहे. नागरिकांनीही राजकीय पक्ष मूग गिळून असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत आहेत.
वाहनतळाला आले डबक्याचे स्वरूप
By admin | Published: July 02, 2017 5:44 AM