ठाणे : भविष्यातला सचिन तेंडुलकर किंवा लता मंगेशकर... बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद किंवा अमिताभ बच्चन होण्याची क्षमता कुणामध्ये आहे, याचा डाटा महापालिकेला एका क्लिकमध्ये उपलब्ध असणार आहे.ठाणे शहर ही गुणवंतांची खाण आहे. मात्र अनेक कलाकार, गुणवंत खाणीच्या कोपऱ्यात दडलेल्या हिºयांसारखे असतात. जोपर्यंत ते दृष्टिपथात येत नाहीत, त्यांना प्रशिक्षणाचे पैलू पडत नाहीत तोपर्यंत ते चमकून नजरेस पडत नाहीत. अशा दडलेल्या नररत्नांची माहिती यापुढे सहज उपलब्ध असेल.ठाणे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांची शारीरिक, वैयक्तिक व शैक्षणिक दर्जाविषयक प्रत्येक वर्षनिहाय माहिती गोळा करण्यासाठी शिक्षण विभागाने स्टुडंट इन्फॉर्मेशनकार्ड ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, चौथी ते सातवीपर्यंतच्या वर्गांत शिकणाºया १५ हजार १८३ विद्यार्थ्यांची माहिती या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.महापालिकेच्या १२० शाळांमधील चौथी ते सातवीपर्यंतच्या वर्गांत शिकणाºया विद्यार्थ्यांपैकी कुणाकुणाची शारीरिक क्षमता क्रीडापटू होण्यायोग्य आहे, कोणकोणत्या विद्यार्थ्यांमध्ये कलागुण आहेत ही वैयक्तिक व कोणत्या विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान, भाषा अशा वेगवेगळ्या विषयांत गती असल्याने त्यांच्यातून शास्त्रज्ञ, भाषातज्ज्ञ, लेखक वगैरे घडू शकतात ही शैक्षणिक दर्जाविषयक माहिती या माध्यमातून संकलित केली जाणार आहे. स्पर्धांमध्ये भाग घेताना तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना लाभ होणार आहे. एखादा विद्यार्थी कशात हुशार आहे, कोणत्या विषयात त्याचे विशेष प्रावीण्य आहे, खेळाडू म्हणून तो कितपत यशस्वी ठरू शकतो, याची माहितीही उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे, हे उद्दिष्ट असल्याचे विभागाने स्पष्ट केले.सव्वाचार कोटींची तरतूदप्रत्येक विद्यार्थ्याच्या तीन चाचणी परीक्षा, दोन सहामाही परीक्षा तसेच शिष्यवृत्ती परीक्षा आणि प्रज्ञा शोध परीक्षेमधील गुणांचे संकलन होणार असून त्याचा अहवाल या माध्यमातून ठेवला जाणार आहे.या माध्यमातून त्याचे वागणे, त्याच्यातील नैपुण्य, गुण, वार्षिक परफॉर्मन्स आदींची माहितीदेखील ठेवली जाणार आहे. यासाठी चार लाख २४ हजार ८०० रुपयांचा खर्च केला जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.
भावी तेंडुलकर, बच्चन यांचा शोध सुरू; महापालिकेच्या १५ हजार विद्यार्थ्यांचे रिपोर्टकार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 3:34 AM