बदलापूर : कन्फर्म आरक्षण न मिळण्यामुळे कोणत्याही मार्गाने तिकीट मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या प्रवाशांना लुटणारी टोळी सक्रिय झाली आहे. एका वेटलिफ्टरला या टोळीने लुटण्याचा प्रकार बदलापूर रेल्वे स्थानकात घडला आहे.
कन्फर्म आरक्षित तिकीट देण्याच्या नावाखाली या खेळाडूकडून पैसे घेऊन हे भामटे पसार झाले. बदलापूर रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक तीनला लागून रेल्वे तिकीट आरक्षण केंद्र आहे. तिकीटासाठी रांगेत उभ्या असलेल्या ए. राठोड या वेटलिफ्टरशी एक इसम येऊन गप्पा मारू लागला. आरक्षित तिकीट मिळत नसल्याचे सांगत त्याने आपण प्रवासी असल्याचे भासवून राठोड यांचा विश्वास संपादन केला. काही वेळानंतर आपल्याच साथीदाराला बोलवत त्याच्याकडून स्वत:चे तिकीट कन्फर्म करून घेत असल्याचे दाखवण्यासाठी त्याने त्याला दोन हजार रूपये दिले. राठोड यांनाही कन्फर्म तिकीट हवे असल्याने त्यांनी या अनोळखी व्यक्तीकडे जाऊन विचारपूस केली. त्यावेळी या दोघांनी मिळून कन्फर्म तिकीटासाठी दोन हजारांची मागणी केली. आरक्षित तिकिटांसाठी असलेली गर्दी आणि आॅनलाइन तिकीट उपलब्ध नसल्याने राठोडने त्या व्यक्तीला दोन हजार रूपये दिले. मात्र पैशांसोबत फॉर्म आणि आधारकार्डची प्रत घेऊन ये असे सांगत त्या दोघांनी राठोड यांना बाहेर पाठवले. काही वेळाने राठोड स्थानकात आधारकार्डाची प्रत घेऊन परत आले असता त्या दोघांनी पोबारा केला होता. याची माहिती त्यांनी तात्काळ रेल्वे स्थानक व्यवस्थापक आणि रेल्वे पोलिसांना दिली.