कल्याण : कर्जबाजारीपणामुळे पैशांची नितांत गरज असल्याने पेट्रोलपंपावर जमा झालेली रोकड मुख्य सूत्रधार रूपेश म्हात्रे याने आपल्या साथीदारांच्या मदतीने लुबाडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या प्रकरणात महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केलेल्या सहा जणांना कल्याण न्यायालयाने रविवारी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पेट्रोलपंप लुटण्याच्या कटातील मुख्य सूत्रधार असलेल्या रूपेश म्हात्रे (२७) याला पैशांची आवश्यकता होती. यातच पेट्रोलपंपाजवळील चहाविक्रेता वैभव भास्कर (२१) याच्याशी त्याचा संपर्क झाला. त्याला पेट्रोलपंपावर जमा होणारी रक्कम बँकेत भरण्यासाठी कधी नेली जाते, याची कल्पना होती. वैभवला काही रकमेचे प्रलोभन दाखवत रूपेशने पेट्रोलपंपावरील रक्कम बँकेत कधी जमा केली जाते, याबाबतची माहिती काढायला सांगितले. वैभवने दिलेल्या माहितीनंतर, रूपेशने आपले साथीदार सचिन शिरोडकर (२३), सोमनाथ ऊर्फ गणेश खंडागळे (२०) आणि नितीन पवार (२८) यांच्या मदतीने पेट्रोलपंप लुटण्याचा कट आखला. त्यानंतर, सात ते आठ दिवस ही चौकडी रक्कम लुटण्याची योग्य वेळ शोधत होती.३१ मे रोजी पेट्रोलपंपावर जमा झालेली १२ लाख ४० हजारांची रोकड आणि धनादेश घेऊन प्रदीप सिंह बँकेत जात होते. त्याचवेळी चौकडीने हल्ला करत त्यांच्याकडील बॅग हिसकावून पोबारा केला. रोकड लुटून पोबारा करणारी ही चौकडी रोहिदास ऊर्फ सोनू सुरवसे (२५) याच्या मदतीने पोलिसांना गुंगारा देत होती. अखेर, गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी चौघांना अटक केली.आरोपी कोठडीतच्चौकशीदरम्यान आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे चहाविक्रेता वैभव आणि त्यांना पळून जाण्यास मदत करणाऱ्या सुरवसे या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. कल्याण न्यायालयाने रविवारी या सहा जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली.