ठाणे : शिवाईनगर येथे ‘वारीमाता गोल्ड’ या सराफाच्या दुकानातून चोरट्यांनी रविवारी पहाटे दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास एक कोटी ३५ लाखांच्या सोने-चांदीच्या दागिन्यांची लूट केली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, गुन्हे अन्वेषण विभागासह तीन पथके तपासासाठी नेमल्याची माहिती सुत्रांनी दिली.परराज्यातील एका व्यक्तीने या ज्वेलर्सच्या बाजूचे दुकान दीड महिन्यांपूर्वीच भाड्याने घेतले होते. या परिसरात १५ ते २० हजार रुपये प्रतिमहिना दुकानाचे भाडे असताना त्याने २८ हजारांच्या भाड्यामध्ये हा गाळा घेतला. त्यासाठी दीड लाखांची अनामत रक्कम दिली. मात्र, भाडेकरार करण्यासाठी भाडेकरूंकडून टाळाटाळ केली जात होती. आपला फळांचा व्यवसाय असून, त्यासाठी हा गाळा घेत असल्याचे त्याने सांगितले होते. या दुकानात तिघांनी ‘अब्दुल फ्रुट्स’ नावाने फळ विक्रीचा व्यवसाय थाटला होता.दिखाव्यासाठी महिनाभरापासून त्यांनी फळ विकण्याचाही बनाव केला. तिघे दुकानात, तर त्यांचा चौथा साथीदार हातगाडीवर टेहळणीसाठी फळ विक्री करायचा. शनिवारी रात्री अब्दुल फ्रुट्स आणि ‘वारीमाता गोल्ड’ या दोन्ही दुकानांच्या मध्यभागी आतील बाजूने भिंतीला त्यांनी भगदाड पाडले. तिथूनच आत शिरकाव करून गॅस कटरने सराफाच्या दुकानातील मोठी लोखंडी तिजोरी त्यांनी फोडली. नंतर या तिजोरी तसेच दुकानातील एक कोटी २० लाखांचे दोन किलो ४०० ग्रॅम सोन्याचे, तर १५ लाखांच्या ३१ किलो चांदीच्या दागिन्यांची त्यांनी लूट केली. रविवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास दुकानाचे मालक मुकेश चौधरी यांनी दुकान उघडले, त्यावेळी हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.
‘गाळे भाड्याने देऊ नये...’ -बोरिवली येथे अलीकडेच एका दुकानाशेजारी असलेल्या फळविक्रेत्याने अशीच सराफाच्या दुकानात चोरी केली होती. अशी टोळी झारखंड भागातील असल्याचे बोलले जाते. त्यामुळे खात्री झाल्याशिवाय, भाडेकराराशिवाय, कोणालाही गाळे किंवा घरे भाड्याने देऊ नयेत, असे आवाहन पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी केली आहे.