मीरा रोड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिक्षात दाेन प्रवाशांनाच परवानगी आहे. जास्त प्रवासी बसवल्यास दाेन हजारांच्या दंडाची कारवाई पोलिसांकडून केली जाते. अनेक रिक्षा चालक कोरोना नियमानुसार दाेन प्रवासीच घेतात. मात्र काही बेशिस्त रिक्षाचालक तीन किंवा चार ते पाच प्रवासी घेऊन त्यांच्याकडून जास्तीचे भाडे उकळत आहेत. शहरातील रिक्षा या सीएनजीवर सुरू आहेत. अजून तरी रिक्षाचालकांनी भाड्यात वाढ केलेली नाही. पण, नव्याने येणारे भाडेदर पत्रक पाहून निर्णय घेण्याचा पर्याय रिक्षाचालकांनी खुला ठेवला आहे.
मीरा रोडमध्ये बहुतांश रिक्षा या मीटरप्रमाणे धावतात. काही प्रमाणात शेअर मार्गही चालतात. भाईंदरमध्ये रिक्षाचालक मीटरप्रमाणे भाडे घेण्यास नकार देतात. प्रवाशांमध्येही याबाबत तेवढी जागरूकता नसली तरी रिक्षाचालकच मीटरप्रमाणे भाडे नाकारत असल्याने भांडण, वाद कोण करत बसणार, अशी व्यथाही प्रवासी मांडतात. मीरा रोड मीटरप्रमाणे भाडे घेतले जात असल्याने प्रवाशांची लूट होत नाही. मीटरप्रमाणे भाडे नाकारून मनमानी भाडे सांगून असंख्य रिक्षाचालक प्रवाशांची लूट करत आहेत. प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस कधी तरी थोडीफार कारवाई करून हात वर करतात. भाईंदरमध्ये किमान भाडे मीटरप्रमाणे १८ रुपये होत असताना प्रवाशांना किमान ३० रुपये मोजावे लागतात. कोरोनामुळे केवळ दाेन प्रवाशांना परवानगी असल्यामुळे शेअर भाडे १० रुपयांवरून १५ रुपये केले आहे. दाेन प्रवासी बसवायचे म्हणून तिसऱ्या प्रवाशाचे भाडे दोन प्रवाशांकडून वसूल केले जात आहे. मात्र अनेक जण ३ ते ५ प्रवासी कोंबतात आणि भाडेही जास्त उकळतात. मुर्धाचे १५ चे २० रुपये तर मोर्वाचे २० चे २५ रुपये आणि उत्तनचे ३० रुपये भाडे असताना तब्बल ५० रुपयांपर्यंत प्रति प्रवासी भाडे घेतले जाते. आता लाेकलमुळे प्रवाशांची संख्या वाढली आहे. लोकल व बसमध्ये गर्दी होत असताना रिक्षासाठी दाेनऐवजी तीन प्रवासी बसवण्याची परवानगी द्या, अशी मागणी रिक्षाचालक संघटना करत आहेत.
मीटरप्रमाणे भाडे न घेणाऱ्या आणि जास्त शेअर भाडे व जास्त प्रवासी बसवणाऱ्यांविरोधात नगरसेवक, राजकारणीही ब्र काढायला तयार नाहीत. तर प्रवाशांच्या संघटनाही आवाज उठवणाऱ्या नाहीत. त्यातच आता रिक्षा भाडे वाढीने आणखी भुर्दंड सहन करावा लागणार आहे. शहरातील रिक्षा सीएनजीवर सुरू असल्याने पेट्रोल-डिझेल दरवाढीचा रिक्षाचालकांना फटका बसलेला नाही. त्यामुळे सध्याच्या कोरोना काळात भाडेवाढ नकोच, असा सूर प्रवाशांचा आहे.
.............
लोकल व बसमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. रिक्षात मात्र केवळ दाेन प्रवाशांची अट अजून कशाला? तीन प्रवासी घेण्याची परवानगी द्या. जेणेकरून प्रवाशांना पडणारा भुर्दंड थांबेल. त्यातच लोकल सुरू झाल्याने प्रवासी संख्या वाढली आहे.
- रेमी डिसोझा, अध्यक्ष, रिक्षा चालक-मालक असोसिएशन
भाईंदरमध्ये मीटर पद्धत सक्तीची करा तसेच मंजूर शेअर मार्गही सुरू ठेवा. मीटरप्रमाणे रिक्षाभाडे मंजूर असतानाही रिक्षाचालक सरळ नकार देतात. मनमानी भाडे उकळतात. त्यांच्यावर नियमित कारवाई केली जात नसल्याने त्यांचे फावले आहे. कोरोनाकाळात रिक्षा भाडेवाढ करायला नको.
- आदित्य कुटे, प्रवासी