ठाणे : ठाणेकरांची होणारी लूट थांबविण्यासाठी महापालिकेने हॉस्पिटल आणि रुग्णवाहिका चालकांसाठी नियमावली तयार केली आहे. तरीसुद्धा अव्वाच्या सव्वा दर आकारून आजही शहरात खाजगी रुग्णवाहिकाचालकांडून रुग्णांची लूट सुरूच आहे.
शहरात कोरोनाबाधितांना वेळेवर रुग्णवाहिका न मिळणे, मिळालीच तर त्यासाठी वाढीव दर घेणे, अशी रुग्णांची लूट सुरू होती. यावर मार्ग काढून महापालिकेने रुग्णवाहिकांसाठी दर निश्चित करून त्यानुसारच अंमलबजावणी करावी, असे बजावले आहे. परंतु, खाजगी रुग्णवाहिकाचालकांनी नियमावलीला केराची टोपली दाखविली आहे.
ठाण्यातील एका कोरोनाबाधित रुग्णाला जवळच्याच रुग्णालयात न्यायचे होते. त्यामुळे त्यांच्या नातेवाइकांनी खाजगी रुग्णवाहिकाचालकाला कॉल केल्यावर त्यांना आठ हजार रुपये लागतील, असे सांगण्यात आले. त्यांनी महापालिकेच्या नियमावलीकडे बोट दाखवून आम्ही ती मानत नसल्याचे सांगून तुम्हाला आठ हजार द्यायचे असतील तरच आम्ही येतो. नाही तर सात ते आठ तास महापालिकेच्या रुग्णवाहिकेची वाट पाहत बसा, असे उर्मट उत्तर त्याने दिले.
या संदर्भात महापालिकेशी संपर्क साधला असता, आम्ही शहरातील कोरोनाबाधितांसाठी पुरेशा रुग्णवाहिकांची व्यवस्था केलेली आहे. तिची मागणी नागरिकांनी करावी, असे सांगितले. तसेच खाजगी रुग्णवाहिकाचालकांकडून जर अशा पद्धतीने लूट केली जात असेल तर संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली.
सलूनमध्ये केस कापणाऱ्या आठ जणांवर गुन्हा
मुंब्रा : लॉकडाउनचे उल्लंघन करून केशकर्तनालये (सलून) सुरू ठेवल्याबद्दल चार कारागीर तसेच केस कापण्यासाठी आलेले चार ग्राहक अशा एकूण आठजणांवर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउनमधून केशकर्तनालये सुरू करण्याची सवलत देण्यात आलेली नाही.
असे असतानाही मुंब्रा-कौसा भागातील ‘ओल्ड नशेमन’ गृहसंकुलामधील ‘स्टायलो’ हेअर कटिंग सलूनमध्ये दरवाजा बंद करून केस कापण्याचे काम सुरु असल्याची माहिती पोलीस तसेच ठामपा प्रशासनाला मिळाली. संयुक्त कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकाला तेथे केस कापण्याने काम सुरु असल्याचे आढळल्यानंतर कारवाई करण्यात आल्याची माहिती मुंब्रा प्रभाग समितीच्या अतिक्रमणविरोधी पथकाचे लिपिक जितेंद्र साबळे यांनी ‘लोकमत’ला दिली.