प्रभू श्री राम सर्वांचाच, मात्र भाजपाने राजकारणासाठी त्याचा वापर केला- रमेश चैन्नीथाल
By नितीन पंडित | Published: January 24, 2024 03:20 PM2024-01-24T15:20:21+5:302024-01-24T15:20:51+5:30
अयोध्या येथील राम मंदिरात प्रभू श्री रामांपेक्षा जास्त महत्व मोदींना दिले गेल्याचाही केला आरोप
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: प्रभू श्री राम हे सर्वांचेच आहेत मात्र भाजप त्याचा राजकारणासाठी वापर करतो.देशात महागाई बेरोजगारी सारख्या अनेक समस्या असून युवकांसोबत सर्वसामान्य जनता त्रस्त असताना भाजपा फक्त मतांचे राजकारण करण्यात व्यस्त आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात तीन वेळा येऊन गेले,परंतु त्यांनी महाराष्ट्रासाठी भरीव असे काहीही केले नाही.श्रीराम सर्वांचे आहेत असून त्यांची पूजा आराधना देशातील कोट्यवधी जनता करीत आली आहे. अयोध्या येथील राम मंदिरात प्रभू श्री रामांपेक्षा जास्त महत्व मोदींना दिला गेला हे सर्व राजकारणासाठी चालले आहे अशी टीका काँग्रेसचे प्रभारी रमेश चैन्नीथाल यांनी भिवंडीत केली.
बुधवारी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चे बांधणी करण्यासाठी कोकण विभागीय काँग्रेस जिल्हा न्याय आढावा बैठकीचे आयोजन भिवंडी येथील वाटिका हॉटेल या ठिकाणी करण्यात आले होते.याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत चैन्नीथाल बोलत होते.या प्रसंगी मार्गदर्शन करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ,
विरोधीपक्ष नेते विजय वड्डटीवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात,आरिफ नसीम खान,चंद्रकांत हांडोर,भालचंद्र मुणगेकर,हुसेन दलवाई यांसह आयोजक ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरघे यांसह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सर्व ताकदीने लोकसभा निवडणूक लढवणार असून महाराष्ट्रातील जागावाटप जानेवारी अखेरीस पूर्ण होणार आहे अशी माहिती देत सर्वच पक्षांना जागा मागण्याचा अधिकार आहे परंतु त्याबाबतचा अंतिम निर्णय इंडिया आघाडीच्या वरिष्ठ पक्ष नेत्यांकडून घेतला जाणार आहे.असेही यावेळी सांगण्यात आले.आसामचे मुख्यमंत्री चोर असून ते सर्वाधिक भ्रष्टाचारी सरकार चालवत आहेत.राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने आसाम सरकारने त्यामध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी राहुल गांधी यांच्या वर एफ आय आर दाखल केली आहे.केंद्र सरकार विरोधकांवर दबाव टाकण्यासाठी ईडी, सीबीआय,इन्कम टॅक्स यांचा वापर करीत असून त्यामुळे रोहित पवार यांच्यावरील कारवाई राजकीय हेतूने असल्याने त्याचा आम्ही निषेध करतो असे मत देखील यावेळी काँग्रेसचे प्रभारी रमेश चैन्नीथाल यांनी व्यक्त करत राष्ट्रपती केवळ आदिवासी व महिला असल्यानेच त्यांना आयोध्या राम मंदिर सोहळ्याला निमंत्रित केले नाही अशी टीका देखील यावेळी करण्यात आली.