ठाणे : समुद्रात कमी दाबाचा पट्टानिर्माण झाल्यामुळे जिल्ह्यात शनिवार, रविवार, साेमवार या तीन दिवसांच्या कालावधीत अवकाळी पाऊस पडला त्यामुळे ४९ गावांमधील २५१.८० हेक्टरवरील काकडी, मिरची , भेंडी भाजीपाल्याचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या सर्वेक्षणातून निश्चित झाले आहे. त्यांच्या भरपाईस अनुसरून शासनाकडेन सबंधीत शेतकऱ्यांची शिफारसही करण्यात आल्याचा दुजाेरा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे यांनी सांगितले.
जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह ढगांच्या गडगडाटात शहरी व ग्रामीण भागात अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्याच्या हाती आलेल्या पिकांचे व रब्बीच्या भाजीपाल्याचे नुकसान झाले. त्याची दखल घेऊन राज्य शासनाने तत्काळ नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश जारी केले. त्यानुसार जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड तालुक्यातील एक हजार ७२७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांच्या या २५१.८० हेक्टर रब्बीचा भाजीपाला, मिरची, भेंडी, हरभरा, वाल आणि भाताच्या नुकसानीचा पंचनामा पूर्ण झाला आहे. त्यानुसार नुकसानीस पात्र असलेल्या या शेतकऱ्यांची शिफारस कृषी विभागाने विभागीय आयुक्तालयाकडे केली आहे.
या पावसादरमयान वीटभट्टीच्या नुकसानीसह घरांवरील पत्र उडाल्याच्या घटनाही यावेळी घटल्या आहेत. त्यांच्या नाेंदी महसूल विभागानेही केल्या आहेत. शेतीच्या नुकसानीमध्ये ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांमध्ये २५६ जणांचा समावेश आहे. त्यांच्या शेतातील ९१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये तूर, वाल,आंबा, मिरची,काकडी, भेंडी आदींचा समावेश आहे. या नुकसानीमध्ये शहापूर तालुक्यातील ३४ गावांमधील १९० शेतकऱ्यांचे ७२.२६ हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. तर मुरबाड तालुक्यातील ७५ शेतकऱ्याच्या १९ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे
या अवकाळी पावसामुळे ३३ टक्केपेक्षा कमी नुकसान झालेल्या शेतकऱ्यामध्ये जिल्ह्याभरातील एक हजार ४६२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक मुरबाड तालुक्यातील एक हजार ४०२ शेतकऱ्याचा समावेश आहे. त्यांच्या १५३.४८ हेक्टरवरील रब्बीच्या पिकांचे नुकसान झाले आहे. याखालाेखाल शहापूर तालुक्यातील ६० शेतकऱ्यांच्या सात हेक्टरवरील शेतीचे नुकसा झाले आहे.